INDvAUS: १२०४ दिवसांची प्रतिक्षा संपली, विराट कोहलीने कसोटीत अखेर झळकावले शतक

अहमदाबाद: भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) 23 नोव्हेंबर 2019 रोजी कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. कोलकातामध्ये बांगलादेशविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीत विराटच्या बॅटमधून अखेरचे शतक निघाले होते. आता 3 वर्षे 3 महिने 17 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहलीने कसोटीत (Virat Kohli Century) शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत विराटच्या बॅटमधून शतक आले आहे.

विराट कोहलीचे कसोटीतील 28वे शतक
विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील हे 28 वे शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सातव्यांदा तीन आकडी धावसंख्या गाठली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 75 व्यांदा शतक ठोकले आहे. अहमदाबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी विराटने 241 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विराट कोहलीने आपले शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 5 चौकार मारले. त्याने सर्वाधिक धावा विकेटच्या मध्यभागी धावून काढल्या.