शिवसेनेवर पूर्ण कब्जा करून ठाकरे घराणे संपवणे हा शिंदे यांचा आता एककलमी कार्यक्रम आहे – चौधरी 

मुंबई – महाराष्ट्रात इतक्या दिवसांच्या राजकीय उलथापालथीनंतर अखेर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले.  देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुरुवातीला या सरकारमध्ये फडणवीस सहभागी न झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते मात्र वरिष्ठ  नेतृत्वाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे.

दरम्यान,  एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीही झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना या घडामोडींवर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी भाष्य करत शिंदे आणि भाजपला लक्ष्य केले आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणाले, एकनाथ शिंदे शिवसैनिक होते आता ते मोदी-शहा संस्कृतीत शिरले. शिवसेनेवर पूर्ण कब्जा करून ठाकरे घराणे संपवणे हा शिंदे यांचा आता एककलमी कार्यक्रम आहे. खुन्नस म्हणजे इतकी की समोरचा संपलाच पाहिजे ही मोदी-शहा संस्कृती.

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाही. हे ही सत्तेतून खाली उतरतील एक दिवस. …पण यांनी भारताची राजकीय संस्कृती जी पूर्णतः उलट्या बाजूनं फिरवून ठेवली, ती मूळ जागेवर येण्यास काही दशकं लागतील किंवा ती कधीच जागेवर येणार नाही. असं चौधरी यांनी म्हटलं आहे.

आणखी एका फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणाले, हक्काचं बहुमत फक्त १०६ + ३९ असं १४५ एवढंच होतं. म्हणजे अपक्ष आणि छोटे पक्ष यांची मिनतवारी करत बसणं आलं. त्यातच जर सर्वोच्च न्यायालयानं आमदार अपात्र ठरवले तर comfortable majority रहात नाही. शिवाय सेनेसारख्या पोलादी संघटनेशी ज्यांनी बेईमानी केली ते आपल्याशी कितपत इमानदार राहतील हा विचार करून भाजपानं मुख्यमंत्रीपद शिंदेंकडे जाऊ दिलं असणार.

फडणवीस उपमुख्यमंत्री झाले असते किंवा नसते तरी हे सरकार त्यांच्याच मर्जीनुसार चालणार होतं. पुढचं एक वर्ष भाजपा स्वतःकडे इनकमिंग वाढवत राहणार. काॅग्रेस आणि राष्ट्रवादीचे ईडीभयग्रस्त रांगा लावणार. सेनेला पुन्हा उभं रहायला कमीत कमी एक वर्ष लागेल म्हणून तिकडेच धीर सुटलेलेही रांगा लावणार.

पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते मुद्दाम पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या मनस्थितीवर बोलतात तेव्हा ‘फडणवीसांना श्रेष्ठी रोकतात तिथं तुमची काय पत्रास, तुम्ही फडणवीसांच्या भरवशावर मला सोडून जाऊ नका’ असा संदेश स्वतःच्याच लोकांना देऊन ‘आऊट गोईंग’ रोखण्याचा एक प्रयत्न असतो. इनकमिंग वाढवून वर्षा-दीड वर्षात ‘शत प्रतिशत भाजप’ हाच अजेंडा आहे. किमान १७० ची खात्री होईपर्यंत हे सरकार चालू राहील.