‘हे’ एकविसाव्या शतकात फारच होतंय गुर्जी! थोडेतरी माणसात या – चौधरी

Mumbai – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी  नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी टिकली लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे विधान केले आहे.

संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना साम टिव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना त्यांनी ”प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो”, असे विधान केले.दरम्यान, काहींनी भिडे यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे तर काहींनी त्याचं समर्थन देखील केले आहे.

या वक्तव्यावरून सध्या चांगलेच वातावरण तापले असून सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी देखील यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘कुंकू लावलं नाही म्हणून माझ्याशी बोलू नको’ हे एकविसाव्या शतकात फारच होतंय गुर्जी! थोडेतरी माणसात या. हिंदुत्ववादी म्हणणार्‍या स्त्रीयांनी यावर विचार करावा की गुर्जीच्या स्वप्नातलं हिंदू राष्ट्र आलं तर त्यांचं आयुष्य कुठून कुठे जाणार आहे! कदाचित आज मुक्त झालेल्या आपल्या मुली उद्या घुंघटमध्ये पहायला लागतील. इकडे अनेक हिंदुत्ववादी विदुषी सुधारलेली भूमिका घेणाऱ्या पुरोगामी लोकांना दररोज घाणेरडं बोलत असतात. आता त्यांची भूमिका काय आहे? जयतु हिंदूराष्ट्रं?असा सवाल देखील त्यांनी केला आहे.