अपक्षांनी थोडक्यात सोडू नये, भाव वाढवून घ्यावेत – विश्वंभर चौधरी

पुणे – शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. यातच एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा देखील आरोप केला जात आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.दरम्यान, आता दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी केलेली एक फेसबुक पोस्ट चांगल्याच चर्चेचा विषय बनली आहे. यात ते म्हणतात, अपक्षांनी थोडक्यात सोडू नये. भाव वाढवून घ्यावेत. राज्यसभेचा भाव शिर्डी संस्थानपेक्षा कमी असणं हा लोकशाहीला काळिमा आहे! लोकशाहीपेक्षा धर्मशाही वरचढ होता कामा नये. भाव वाढवा, प्रतिष्ठा वाढवा. असं ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.