पुणे : शरद पवार साहेब वयाची 81 वर्षे उलटली तरी राज्यासह देशातील विविध कार्यक्रमात सहभागी होत असतात. दोन – तीन तासांचा प्रवास करूनही कार्यक्रमात टवटवीत फुलाप्रमाणे असतात, कारण साहेबांचे संगीत, कला, साहित्य यावर असणारे प्रेम. कायम प्रफुल्लित असण्यामागे कला हेच पवार साहेबांचे औषध आहे असे मत ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मणियार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दीवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत चित्रकार आणि शिल्पकार यांचा सहभाग असणारा ‘चित्र-शिल्प संवाद’ हा एक आगळा वेगळा उपक्रम दि. 8 ते 12 डिसेंबर 2021 या काळात पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिर येथे विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, आयोजक ‘दीवा प्रतिष्ठान’चे संस्थापक दीपकभाऊ मानकर, महापालिका विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, दीवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष करण मानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस कला व सांस्कृतिक विभाग जिल्हा अध्यक्षा प्रिया बेर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस कला व सांस्कृतिक विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सुरेखा कुडची, ज्येष्ठ चित्रकार मुरलीधर लाहोटी, शिल्पकार विवेक खटावकर, बापूसाहेब झांजे, दत्ता सागरे, निलेश आर्टिस्ट आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मणियार म्हणाले की, पवार साहेबांचे कार्य कर्तृत्व महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दीपक मानकर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. या प्रदर्शनात पवार साहेबांचे अनेक दुर्मिळ फोटो त्यांनी जमा केल्याचे दिसते. पवार साहेबांच्या कला, संगीत, साहित्य विश्वातील आठवणींना उजाळा दिला. तसेच हे चित्र शिल्प प्रदर्शन बारामती येथे पवार साहेबांसाठी घ्यावे असे निमंत्रण मणियार यांनी दीपक मानकर यांना दिले.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, कलाकारांच्या कलेचे मोल लावता येत नाही. माणसाच्या किमान गरजा संपल्या की कलेची गरज निर्माण होते. अवघड परिस्थितीत सकारात्मक विचार करण्यासाठी कला आणि कलाकार खुप मदत करतात. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कलाकारांना राजाश्रय देण्याचा शिष्टाचार आहे. आज शरद पवार यांच्या काळातही हा शिष्टाचार सुरू आहे. पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी कलाकारांना मानधन देऊन त्यांचा सत्कार केला तसेच यामध्ये सातत्य राहावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
प्रशांत जगताप म्हणाले, आपल्या सर्व सामान्य माणसाशी नाळ बांधून ठेवलेला नेता म्हणजे शरद पवार साहेब. ज्येष्ठ राजकारणी वयाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर आता बास असे म्हणतात; पण वयाच्या 81 वर्षी ही पवार साहेब भारतभर फिरत आहेत. महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही. राजर्षी शाहू महाराज यांच्या पासून राज्यात कलाकारांना राजाश्रय देण्याचा प्रघात आहे. त्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि त्यानंतर शरद पवार यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला आहे. पवार साहेब यांनी राजकारणापलीकडे जाऊन अनेक कलाकार तसेच विविध साहित्य संमेलने यांना मदत केलेली आहे.
अंकुश काकडे म्हणाले, वाढदिवस म्हटले की अलीकडे फक्त फ्लेक्स बाजी असते. परंतू दीपक मानकर गेल्या 15 वर्षांपासून पवार साहेबांचा वाढदिवस वेगवेगळे विधायक कार्यक्रम घेवून साजरे करीत आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामूळे उध्वस्त झालेले सामान्य जनतेसह कलाक्षेत्रातील अनेक संसार दीपक भाऊंनी पुन्हा उभे करून दिले. कलाकारांना राजाश्रय मिळावा असे अनेकजण म्हणतात पण किती लोक त्यासाठी प्रयत्न करतात? या उपक्रमातून दीपक भाऊंनी आज अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
प्रास्ताविक भाषणात दीपक मानकर म्हणाले की, शरद पवार साहेब माझे दैवत आहेत. साहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा माझा प्रयत्न आहे. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील चित्रकार, शिल्पकार यांना एकत्रित करून वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे, या प्रदर्शनातील चित्रे आणि शिल्प बारामती येथे एका हॉल मध्ये ठेवण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून साहेबांना भेटायला येणाऱ्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना ते बघायला मिळेल. यावेळी विवेक खटावकर, प्रमोद कांबळे, प्रिया बेर्डे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार योगेश सुपेकर यांनी मानले.