घरी सत्कार होणे म्हणजे काय असते, याची आज प्रचिती – विवेक फणसळकर

स.प. महाविद्यालयात संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्यात व्यक्त केल्या भावना

पुणे : माझ्या मनात स. प. महाविद्यालयाच्या (SP Collage) अनेक सुंदर आठवणी आहेत. अनेक चांगले मित्र, उत्तम शिकवणारे शिक्षक, अनेक अनुभव अशा विविध गोष्टी मला या महाविद्यालयाने दिल्या आहेत. आज झालेला हा सत्कार अतिशय ह्दय, मनापासून आणि प्रेमाचा असा सत्कार आहे. घरी सत्कार होणे म्हणजे काय असते याची प्रचिती आज होत आहे,अशी भावना पोलीस महासंचालक व मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Mumbai Police Commissioner Vivek Fansalkar) यांनी व्यक्त केली.

शिक्षण प्रसारक मंडळी आणि स.प. महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असणारे फणसळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे शनिवारी ( दि.१४) संपन्न झालेल्या सोहळ्यात शिक्षण प्रसाक मंडळी’चे अध्यक्ष सदानंद फडके यांच्या हस्ते फणसळकर यांना शाल, श्रीफळ व कॉफीटेबल बुक देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण प्रसाक मंडळी’चे उपाध्यक्ष गजेंद्र पवार, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड एस के जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, प्रभारी प्राचार्य सुनील गायकवाड, माजी प्राचार्य व माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष दिलीप शेठ, उपाध्यक्ष रमेश पाटणकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमात फणसळकर यांनी महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना फणसळकर म्हणाले, विद्यार्थ्यांनो तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, काहीही काम करा, पण काम असे करा की तुमच्याबाबत आणि तुमच्या कामांबाबत इतरांना खात्री असली पाहिजे. तसेच एखादी गोष्ट आपल्याला शक्य होईल की नाही, अशी शंका मनात आणून कोणत्याही गोष्टीची सुरूवात करू नका. ती गोष्ट होणारच आहे, अशी खात्री बाळगून ती गोष्ट करा, त्यामध्ये निश्चितच यश मिळेल. आयुष्य घडवताना, प्रत्येकाचे काही उद्दिष्ट ठरविलेले असतात. अनेकदा तिथपर्यंत पोहचण्याचा जो प्रवास आहे, त्याचा विचार करूनच लोक दमतात. त्यामुळे तुम्ही उद्दिष्टांचा विचार न करता, तिथपर्यंत पोहचण्याचा जो प्रवास आहे, त्याचा आनंद घ्या.

फडके म्हणाले, आज जे समाधान आहे, ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. माजी विद्यार्थ्यांचे यश हीच आमची खरी संपत्ती आहे. भरघोस यश देणारे माजी विद्यार्थी अखंडपणे महाविद्यालयात घडत राहो, अशी आम्ही महाविद्यालयाचे व्यवस्थापन म्हणून नेहमीच अपेक्षा करतो. आगामी काळात राष्ट्रसमोर जी संकटे येणार आहेत, त्यांना सामोरे जाणारे सक्षम अधिकारी तयार होणे हे गरजेचे आहे. असाच एक सक्षम अधिकारी म्हणून फणसळकर यांची ओळख आहे. त्यांच्या हातून पुढील काळादेखील अनेक चांगली कार्य होवो, अशा शुभेच्छा आज आम्ही त्यांना देत आहोत.

काही लोकं खुर्ची’ने मोठी होतात, तर काही लोकं खुर्ची’ला मोठे करतात, फणसळकर हे त्यापैकीच एक असे सांगत अ‍ॅड जैन यांनी फणसळकर यांना राज्य,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी काम करण्याची संधी मिळो, अशा शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पोलीस दलाच्यावतीने माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी तर फणसळकर यांच्या प्राध्यापिका असलेल्या तारा थोरात यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्त्ताविक करताना गजेंद्र पवार यांनी विवेक फणसळकर यांचे बालपणीचे व महाविद्यालयीन जीवनावरील विविध किस्से सांगितले. महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उप-प्राचार्य डॉ. विद्या अवचट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.