प्रचारादरम्यान मतदारांनी फ्रान्सिस डिसोझा यांच्या आठवणींना दिला उजाळा; जोशुआ झाले भावूक

म्हापसा : येत्या १४ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या विधानसभ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हापसा मतदारसंघात उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका सुरु असून यात आमदार जोशुआ डिसुझा यांनी आघाडी घेतली आहे.  आपला प्रचार जोमाने सुरु ठेवताना काल जोशुआ डिसोझा यांनी प्रभाग २० मध्ये घराघरातून प्रचार मोहीम हाती घेतली.

गांवसावाडी परिसरातील प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. या प्रचार कार्यात त्यांच्यासोबत नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, माजी नगरसेविका चित्रा मणेरकर, कविता आर्लेकर, म्हापसा मतदारसंघातील पक्षाचे युवा सचिव रितेश मणेरकर तसेच अनेक कार्यकर्ते त्यांच्या समवेत उपस्थित होते.

प्रचारा दरम्यान  काही मतदारांनी  जोशुआचे वडील दिवंगत माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या आठवणींना उजाळा दिला.त्यांनी  त्यांनी मतदारसंघातील केलेले कार्य आणि गरजू नागरिकांना वेळोवेळी केलेल्या सहकार्याची यावेळी माहिती त्यांचे पूत्र जोशुआंना दिली. तसेच त्याच्या पाठीमागे खंबीरपणेउभे राहण्याचे आश्वासनही दिल्यावर जोशुआ हे काहीसे भावूक झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, यावेळी मतदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता आपण भारावून गेल्याचे डिसोजा म्हणाले. प्रचारादरम्यान जेष्ठ मतदारांकडून मिळत असलेले आशिर्वाद आणि युवा मतदारांचा लाभलेला पाठिंबा हेच आपले पाठबळ असून या पाठबळावर आपण विजयी होणार असल्याचा दावा जोशुआ डिसोझा यांनी केला.