मुंबईत महविकास आघाडीचे गोडवे तर नगरमध्ये काँग्रेसने सुरु केली सेनेला खिंडार पाडण्याची तयारी !

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मिळून धरणे आंदोलन करण्यात येत असून, सत्तेतील तीन पक्षांची एकजूट दाखवण्यात येत आहे.

मात्र दुसरीकडे राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लक्षात घेता अहमदनगरमध्ये काँग्रेसने शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची तयारी सुरु केली आहे. अकोले तालुक्यात पहिला धक्का शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील काही जन दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयार असल्याची चर्चा आहे.

अकोले तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप सुरू झाले आहेत. युवानेते सतीश भांगरे पुन्हा स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेनेचे अनेक पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य शिवबंधन तोडण्याच्या तयारीत आहेत. काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर काही नेते काँग्रेस पक्षात जाणार आहेत.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सतीश भांगरे यांचे बॅनर अकोले शहरात लावले गेले होते. मात्र या बॅनरवर थोरात वगळता कोणत्याही नेत्याचा फोटो दिसुन आला नाही तसेच त्यांच्या गाडीच्या पाठीमागे असलेला शिवसेना पक्षाचा लोगो त्यांनी काढून घेतला आहे या कारणाने युवानेते सतीश भांगरे हे पक्ष सोडतील असा अंदाज वर्तवला जात आहे.