प्रत्येक कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापांसारखे योद्धे निर्माण व्हावे –   कोश्यारी

मुंबई : राजस्थानने देशाला भामाशांसारख्या दानशूर व्यक्ती दिल्या तसेच महाराणा प्रतापांप्रमाणे आदर्श योद्धे दिले असल्याचे नमूद करून प्रत्येक कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रतापांसारख्या पराक्रमी शूरवीर योद्ध्यांची आवश्यकता असून त्यांच्याप्रमाणे योद्धे पुनश्च निर्माण व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांनी केले.

राजस्थान दिवसाचे (Rajasthan Day) औचित्य साधून बुधवारी (दि. 30 मार्च रोजी) ‘एक शाम महाराणा प्रताप के नाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे (Cultural Program)आयोजन गरवारे क्लब, मुंबई येथे करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन कुंदन सोशल फाउंडेशन व शेरी-दिया फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी यावेळी पर्यावरणाच्या गंभीर समस्येचा उल्लेख करताना प्रत्येकाला झाडे लावण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाला हास्य कलाकार सुनील पॉल, माजी आमदार राज पुरोहित, कुंदन सोशल फाउंडेशनचे संस्थापक कुंदनमल जैन, अध्यक्ष अनिल जैन, शेरी-दिया फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश कोठारी, राजस्थानी गायक प्रकाश माला उपस्थित होते.राज्यपालांच्या हस्ते यावेळी जॅकी श्रॉफ, रिद्धी सिद्धी बुलियनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी व बाबुलाल संघवी यांचा सत्कार करण्यात आला.