हात जोडले, माथा टेकवला; वृंदावनातील आश्रमात स्वामींच्या दर्शनासाठी पोहोचले ‘कोहली कुटुंब’

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि कुटुंबाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट, त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिका (Vamika Kohli) दिसत आहेत. ते वृदांवन येथे स्वामी प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात आशीर्वाद घेण्यासाठी गेले असल्याचे व्हिडिओत (Virat Kohli-Anushka Sharma Video) दिसत आहे. कोहली कुटुंबाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधतोय.

क्रिकेटपटू विराट सध्या भारतीय संघाच्या वर्कलोड व्यवस्थापनाअंतर्गत विश्रांतीवर आहे. या रिकाम्या वेळेचा विराट पुरेपूर फायदा घेताना दिसत आहे. तो नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कुटुंबासह दुबईला गेला होता. यानंतर आता तो भगवान श्री कृष्णांच्या नगरीत अर्थातच मथुरा-वृदांवनला पोहोचला आहे. त्याने वृंदावनात जाऊन आश्रमाला भेट दिली आणि स्वामीजींचा आशीर्वादही घेतला आहे.

व्हिडिओत दिसते की, स्वामीजींना विराट आणि अनुष्काबद्दल जास्त काही माहिती नाही. त्यांच्या आश्रमातील एक व्यक्ती स्वामींना त्या दोघांचा परिचय करून देते. विराट क्रिकेटपटू असून अनुष्का बॉलीवूड अभिनेत्री आहे, असे तो व्यक्ती सांगतो. यानंतर स्वामी आश्रमातील एका भक्ताला अनुष्काला ओढणी आणि विराटला माळ घालायला सांगतात. यावेळी वामिका आई अनुष्काच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. स्वामी वामिलाही छोटी माळ घालायला लावतात. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक केले जात आहे.