पुण्याचे पाणी पेटणार ?, महापौर मुरलीधर मोहोळ यांचे गंभीर आरोप

पुणे : पुणे शहराचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार असल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे. पुणे महापालिकेत नवीन ३४ गावं समाविष्ठ झाल्यानंतर साधारणपणे ५ लाख लोकसंख्या वाढली आहे. अशात पुणे शहराचा पाणी कोटा वाढवणे अपेक्षित होते. मात्र आता उद्यापासून ( 3 डिसेंबर ) खडकवासला धरणातील पाणी वाटपावर थेट पाटबंधारे विभाग नियंत्रण करणार असून, पोलिस बंदोबस्तात पुण्याचे पाणी कपात केले जाणार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यावरून आता खुद्द महापौर मुरलीधर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिका सध्या खडकवासला धरणातून १४६० एमएलडी आणि भामा खासखेड धरणातून १८० एमएलडी पाणी रोज वापरत आहेत. हा पुरवठा आता कमी केला जाणार आहे.

या निर्णयामुळे पुणेकरांसमोर पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारवर गंभीर टीक केली आहे. भामा आसखेड धरणातून पोलीस बंदोबस्तात पाणीपुरवठा कमी केला जाणार आहे, असा त्यांनी आरोप केलाय. तसेच हा पाणीपुरवठा कमी करु नये अशी विनंती त्यांनी पालकमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना केली आहे. तर उद्या पाणी कपात केले तर धरणावर जाऊन आंदोलन करेन असा इशारा मोहोळ यांनी दिला आहे. महापौरांच्या या गंभीर आरोपामुळे पुण्यात पाणी पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाने महापालिकेसोबत ११.५ टीएमसी पाण्याचा करार केलेला आहे. भामा आसखेड धरणातून पुण्याला २.६७ टीएमसी पाणी मिळत आहे. पाटबंधारे विभागाने भामा आसखेडमधून मिळणारे पाणी हे ११.५ टीएमसी यातील आहे तो अतिरिक्त कोटा नाही. त्यामुळे खडकवासला धरणातून वापरले जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करावे असे यापूर्वी सांगितले आहे. २२ जानेवारी रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी महापालिकेला पाणी वापर कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच २६ मार्च रोजीच्या कालवा समितीच्या बैठकीत देखील अजित पवार यांनी पुन्हा एकदा महापालिकेला सूचना केली होती.

हे देखील पहा