Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे पक्ष आणि भाजपातील जेष्ठ नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून त्यांना आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करतायेत असा आरोप शिवसेना नेते रामदास कदमांनी केला आहे.
शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, मी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवलं आहे. तुमचा सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याला आवर घाला. तो युती तोडण्याचं काम करतोय. दापोलीत जी भाजपा आहे ती आमच्या मुळावर कशी उठलीय ते मी दिल्लीला कळवलं आहे. १४ वर्षानंतर प्रभू रामाचा वनवास संपला परंतु मुंबई-गोवा महामार्गाचा वनवास संपला नाही. नितीन गडकरींनी स्वत: लक्ष घालावे यासाठी शिष्टमंडळाला घेऊन भेट घेणार आहे. आम्ही काय पाप केलंय, रवींद्र चव्हाण हे चमकोगिरी करतात. काम करत नाही. खड्डेमय रस्ते आहेत. नुसते पाहणी दौरे कशासाठी, रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री त्यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी संतप्त भूमिका त्यांनी मांडली.
आता रामदास कदम यांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले आहे. आम्हीही माणसं आहोत, आमचीही मनं दुखावतात. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकारचे आरोप करणे हे कुठल्या युती धर्मात बसते. त्यामुळे जर रामदास भाईंचे काही म्हणणे असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडले पाहिजे. प्रत्येक वेळी भाजपला, भाजपच्या नेत्यांना अशा प्रकारे वेठीस धरणे यातून एक चांगली भावना तयार होत नाही, असे मला वाटते. तरी मी भाईंचे काय म्हणणे आहे हे समजून घेईल आणि त्यातून मार्ग काढेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तर रामदास कदम यांनी भाजपाला जर राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी तुम्ही तुमचे लढा, आम्ही आमचे लढू, असेही म्हटले. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रामदास भाई असे वारंवार टोकाचे बोलतात. त्याने आमचे मनं देखील दुखावले जातात. शेवटी आम्हीही माणसं आहोत. 50 गोष्टी आम्हालाही त्याच्या उत्तरावर बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळावे. वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं हे आम्हाला मान्य नाही. याबाबत मी स्वतः एकनाथ शिंदे यांच्या सोबत बोलेल, असे उत्तर त्यांनी रामदास कदम यांच्या टीकेवर दिले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Shishupal Patle : भाजपाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश