गुजरातला वाहून जाणारे महाराष्ट्राचे पाणी वळविण्यास आपले प्रयत्न सुरू आहे – छगन भुजबळ

नाशिक – सहकार क्षेत्र हे अतिशय कठीण क्षेत्र आहे. या क्षेत्रात अतिशय चोखपणे काम करण्याची आवश्यकता आहे.नाशिक मध्ये शेतीची चांगली अवस्था असतांना देखील साखर कारखाने बंद पडले आहे. त्यामुळे साखरेसोबत ईथेनॉल व बायोप्रॉडक्ट्स निर्मितीवर भर दिल्यास कारखान्यास नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केले. पळसे येथील नाशिक सहकारी कारखानाच्या नूतनीकरण समारंभ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase), युवराज छत्रपती शहाजीराजे भोसले,आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे(saroj Ahire), आमदार हिरामण खोसकर, माजी मंत्री बबनराव घोलप (Babrao Gholap), माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार योगेश घोलप, कारखान्याचे व्यावस्थापकीय संचालक दिपक चंदे, शिवसेना उपनेते सुनील बागुल, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, माजी महापौर दशरथ पाटील, शिवसेना शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर, शिवसेना ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, शिवाजी चुंभळे, व्यापारी बँकेचे चेअरमन निवृत्ती अरिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, माजी चेअरमन दिनकर आढाव, माजी चेअरमन तान्हाजी गायधनी,राजाराम धनवटे,लीलाताई गायधनी,निवृत्ती डावरे, बी.पी.गायधनी, मधुकर जेजुरकर, कामगार नेते जगदीश गोडसे, करण गायकर, सरपंच सुरेखा गायधनी, जिल्हा बँकेचे प्रशासक अरुण कदम, प्राधिकृत अधिकारी दिपक पाटील, जिल्हा बँक कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा कात टाकतोय याचा आनंद आहे. या कारखान्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी सर्वांना एकत्र आणले. युवराज छत्रपती शहाजीराजे यांनी सर्वांना अश्वस्त केले आहे. सरोज आहिरे यांनी देखील यासाठी विशेष पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, हा कारखाना बंद का पडला याचा अभ्यास चालविणाऱ्यांनी करून त्यात सुधारणा करून कारखाना सुरू करावा. पूर्वी झालेल्या चूका टाळल्या तर यश नक्कीच मिळणार आहे. नासाका कारखाना सुरू झाल्यानंतर तो बंद होता कामा नये. जेवढी जबाबदारी चालविणाऱ्यांची आहे तेवढीच जबाबदारी शेतकऱ्यांची देखील आहे.शेतकरी आणि कारखानदार यांनी समन्वय ठेवला उर्जितावस्था मिळाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, गुजरातला वाहून जाणारे महाराष्ट्राचे पाणी वळविण्यास आपले प्रयत्न सुरू आहे. त्यातील मांजरपाडा हा पथदर्शी प्रकल्प आपण यशस्वीपणे पूर्ण केला आहे. दमणगंगा एकदरे कडवा प्रकल्पाचा डीपीआर तयार झाला आहे.या प्रकल्पातून ७ टीएमसी पाणी पूर्वेकडे येणार आहे यासाठी १५९९ कोटी रुपये खर्च येणार आहे.. नाशिक जिल्ह्यात अधिक पाणी उपलब्ध व्हावा, तो सुजलाम सुफलाम होऊन शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युवराज छत्रपती शहाजीराजे, माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे, माजी संचालक निवृत्ती डावरे, मनोगत व्यक्त केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तान्हाजी गायधनी यांनी केले.