जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी – ठाकरे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. मात्र आता तुम्ही निवडणूक आल्यावर गुण्यागोविंदाने काम करा असे आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना केले आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur north election) आज उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून सभेला संबोधित केलं. यावेळी ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेसला मतदान करणे पाप असेल तर भाजपाने मेहबुबा मुफ्तीसोबत युती केलीच ना? शिवसेनेने भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्त्व सोडले असे होत नाही, कारण भाजप म्हणजे हिंदुंत्त्व नव्हे असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपाला टोला यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात भाजपने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, लोकांनी त्याला झिडकारलं. हिंदूहृदयसम्राट म्हटल्यावर लोकांच्या समोर एकच नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू अडचणीत असताना कोणतीही पर्वा न करता मदतीला जाणारा म्हणजे हिंदूहृदयसम्राट होय. भाजपचा भगवा हा खरा भगवा नाही, नकली भगव्याचा बुरखा हा फाडायला हवा. असं ते म्हणाले.