‘भारताच्या वाढत्या प्रभावामुळेच आपण हजारो विद्यार्थ्यांना युक्रेनमधून आपल्या मायदेशी परत आणले आहे’

पुणे – जगातील अनेक देशांना युद्धग्रस्त युक्रेनमधील आपल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणणे अवघड जात असताना भारतीय विद्यार्थ्याना मायदेशी आणण्यासाठी भारताची ऑपरेशन गंगा मोहीम अत्यंत गतिमान पद्धतीनं सुरू आहे.भारताच्या वाढत्या प्रभावामुळेच आम्ही हजारो विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले आहे; असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात सांगितलं. सिम्बायोसिस संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

संस्थेच्या लवळे परिसरात ७० एकर परिसरात निर्माण करण्यात आलेल्या आरोग्यधाम संकुलाचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झालं. युवा पिढीच्या सामर्थ्यावर केंद्र सरकारचा विश्वास असून कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात निर्माण झालेल्या अनेक संधींचा लाभ युवकांनी घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

देशासमोर असलेल्या विविध आव्हानांवर विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून आणि विद्यापीठातील संशोधनातून उत्तरं मिळायला हवीत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.  भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. सात वर्षांपूर्वी भारतात फक्त 2 मोबाईल उत्पादक कंपन्या होत्या.  आज 200 हून अधिक उत्पादन युनिटस  या कामात गुंतलेली आहेत, असे ते म्हणाले. संरक्षण क्षेत्रातही जगातील  सर्वात मोठा आयातदार देश म्हणून ओळखला जाणारा भारत आता संरक्षण निर्यातदार होत  आहे. आज, दोन मोठ्या  संरक्षण संधी प्राप्त होत  आहेत, ज्याद्वारे  देशाच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वात मोठी आधुनिक शस्त्रे तयार केली जातील, असेही पंतप्रधानांनी सांगितले.