आम्हाला समीरचा सार्थ अभिमान, समीर वानखेडेंच्या काकांनी सत्य आणले समोर !

वाशीम : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकरी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर पोस्ट केला. त्यावर समीर दाऊद वानखेडे असं लिहून फ्रॉडला इथूनच सुरुवात झाल्याचं म्हटलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. वानखेडे यांच्या नावाबाबत तर्कवितर्क लढवले गेले. एवढेच नव्हे तर ते कोणत्या जातीचे आहेत यावरही चर्चा सुरू झाली.

मात्र, समीर वानखेडे यांचे चुलते शंकरराव वानखेडे यांनी सत्य बाजू समोर आणली आहे. समीर वानखेडे यांचे मूळगाव असलेले वरूड तोफा हे वाशीम जिल्हयातील रिसोड तालुक्यात येत असून वाशीम-रिसोडवरील आसेगावपासून 5 किमी आहे. याठिकाणी समीर वानखेडे यांची वडिलोपार्जीत शेती व घर असून त्यांचे चुलत भावंड राहतात. सध्या त्यांचे काका शंकरराव कचरूजी वानखेडे हे सेवानिवृत्त असून सध्या वाशिम शहरातील लाखाळा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी जाऊन समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे यांचे मूळ कागदपत्रे बघितली असता त्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे अनुसूचित जातीचे असल्याचं दिसून आलंय.

अशा प्रकारे ड्रग्स माफियांविरोधात आपला पुतण्या करीत असलेल्या कारवायांचा अभिमान आहे. समीर हा आपल्या कुटुंबाचा सदस्य असल्याचा आम्हा सर्व वानखेडे कुटुंबीयांना अभिमान असल्याचे वाशीम येथील लाखाळा स्थित त्यांचे मोठे बाबा शंकरराव वानखेडे यांनी सांगितले. अधिकारी झाल्यानंतर समीर वानखेडे हे वाशीम येथील आपल्या घरी व वरूड तोफा येथे येवून गेलेले आहेत. समीर हा अत्यंत शांत, प्रेमळ आणि नि:स्वार्थी असल्याचे शंकरराव वानखेडे यांनी सांगितले.