‘इतिहास घडविणाऱ्या महापुरुषांचे विचार आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहेत’

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचे समतेचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची जबाबदारी असून ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी (एआयएसएसएमएस) हे कार्य समर्थपणे पार पाडत आहे, अशा शब्दात पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संस्थेचा गौरव केला.

‘एआयएसएसएमएस’च्या श्री शिवाजी प्रीपेरेटरी मिलिटरी स्कूलला मंत्री श्री. ठाकरे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार प्रफुल्ल पटेल, संस्थेचे सचिव माजी आमदार श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, इतिहास घडविणाऱ्या महापुरुषांचे विचार आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहेत. त्यातूनच महाराष्ट्र आणि देशाची नवी पिढी सुसंस्कारित आणि समृद्ध होईल. खासदार पटेल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आणि शाहू- फुले- आंबेडकरांच्या विचारांवर चालतच आजचा आपला देश घडला आहे. शिक्षण आणि सामर्थ्य या दोन्ही बाबींवर छत्रपती शाहू महाराजांनी भर दिला.

श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली.प्रारंभी संस्थेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.