मोदी भक्तांच्या भाषेत आणि किरण मानेंच्या भाषेत काय फरक आहे? चौधरींची रोखठोक भूमिका

 मुंबई – स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ( mulgi zali ho ) या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने विलास पाटालाची भूमिका साकराताना दिसतात. अभिनेते किरण माने त्यांच्या भूमिकेमुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात.

दरम्यान, आता भाजपविरोधी राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर काही मंडळी माने यांना पाठींबा देत आहेत तर काहींनी खडेबोल देखील सुनावले आहेत. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते  विश्वंभर चौधरी यांच्या एका फेसबुक पोस्टची देखील सध्या बरीच चर्चा आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, किरण माने यांची अभिव्यक्ती अशा भाषेत असेल तर I do not stand with Kiran Mane. आजच तरुण मित्र जेएस चिखलीकर यांच्या वाॅलवर हा स्क्रीन शाॅट पाहिला. फेसबुकवर त्याआधी I stand with Kiran Mane ही मोहीमही पाहिली.

मला अनेकांनी विचारलं की तुम्ही का नाही पाठिंबा देत? या अभिनेत्याची व्यक्त होण्याची ही भाषा असेल तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पाठींबा देऊन आपण आपलीच विश्वासार्हता कमी करून घेत असतो. मोदी भक्तांच्या भाषेत आणि या भाषेत काय फरक आहे? मोदी आज पंतप्रधान आहेत, उद्या नसतील. फडणवीस काल मुख्यमंत्री होते, आज नाहीत तसंच. पण भाषा कायम राहणार आहे. ती जर अशी झाली तर या देशात अराजक येईल याचं भान कोण ठेवणार? आणि मग अर्वाच्च बोलणाऱ्या भक्तांना आपण कोणत्या नैतिक अधिकारात बोलणार?

हे अशा भाषेचं स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. तसं तर काय फेक अकाऊंटच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी परिषदा घेणारे पण आहेत, त्यांचं त्यांना लखलाभ. भाषेचा विवेक सुटतो अशा कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढून आपली आणि ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या संकल्पनेची विश्वासार्हता कमी करून टाकू नका. जर सभ्य भाषेतल्या अभिव्यक्तीवर गदा येत असेल तर प्राण पणाला लावून लढा. जीव गेला तरी सभ्य भाषेतली अभिव्यक्ती टिकवलीच पाहिजे पण एका एका वाक्यात दोन दोन शिव्या लिहिणारांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या स्वातंत्र्याला पात्र नाही.