‘अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ’, देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊत यांना सुनावले खडेबोल

पुणे- केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देत उद्धव ठाकरे यांना ४४० व्होल्टचा झटका दिला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झाल्याचे दिसत आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले”, असं म्हणत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचा समाचार घेतला.

संजय राऊत यांनी बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील असा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

यावरुन आता भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, राजकारणात माणूस कधी वर तर कधी खाली जातो. आणि इतक निराश होऊन मनात येईल ते बोलायचं यातून त्यांच्या बुद्धीची लोकं किंव करतात. त्यांच्या बोलण्याने काही परिणाम होत नाही. संजय राऊत निर्बुद्धपणे बोलतात. अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ असं सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.