“त्यात काय चुकीचं आहे?”, वीर दासच्या समर्थनाथ पुढे आली काम्या पंजाबी

मुंबई : अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास त्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोक वीर दासवर देशाचा अपमान केल्याचा आरोप करत आहेत. वीर दास सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत त्याच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्याने माफी मागितली असली तरी देखील सोशल मीडियावर अनेकांनी त्याने भारताचा अपमान केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अभिनेत्री काम्या पंजाबी वीर दासला पाठिंबा देत पुढे आली आहे.

काम्याचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत काम्या बोलते “तो जे बोलला त्यावर मी सहमत आहे की भारताच्या दोन बाजू आहेत. एक अशी बाजू आहे ज्यावर आम्हाला गर्व आहे. त्याच्यासाठी आम्ही जिव द्यायला ही तयार आहोत आणि एक अशी बाजू आहे ज्यात बदल झाले पाहिजे अशी आशा आपण करतो. त्यामुळे तो जे बोलला आहे त्यात काय चुकीचं आहे?”

वीर दासच्या या संपूर्ण व्हिडिओतली एक छोटी क्लिप ट्विटरवर प्रचंड व्हायरल झाली आहे. ही क्लिप पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. “मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे हवा गुणवत्ता निर्देशांक ९००० आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे पाहतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आम्ही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकर्‍यांवर धावून जातो,” असे वीर त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बोलत आहे.