भारतीय नोटांवरील गांधीजींचा हसतमुख फोटो नेमका कधीचा आणि कुठला? फोटोग्राफर कोण होता?

आपणा सर्वांना माहिती आहे की, भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो असतो. आपण नेहमी महात्मा गांधीजींचा (Mahatma Gandhi) हसरा फोटो नोटांवर पाहतो. सर्वच नोटांवर गांधीजींचा एक प्रकारचाच फोटो आहे. पण हा फोटो नेमका कुठला आहे? कुणी काढला आहे? किंवा ते एखादं चित्र आहे का? असे प्रश्न अनेकदा आपल्याला पडतात. अनेकजण म्हणतात की गांधीजींचा हा फोटो कुण्यातरी चित्रकाराने रेखाटला आहे आणि तेच चित्र नंतर नोटांवर छापण्यात आलं. पण ही गोष्ट खरी नाही. खरं सांगायचं तर गांधीजींचा नोटांवरील असलेला फोटो हा 1946 साली कुण्यातरी अज्ञात फोटोग्राफरने काढला आहे. हा फोटो त्या वेळच्या व्हाईसरॉयच्या निवासस्थानासमोरचा, म्हणजे आताच्या राष्ट्रपती भवनच्या (Rasthtrapati Bhavan) समोरचा आहे.

महात्मा गांधी 1946 साली त्यावेळचे भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड व्हेवेल (Lord Wavell) यांच्या भेटीसाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते. त्यावेळी गांधीजींच्या सोबत लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पॅथीक लॉरेन्स (Lord Frederick William Pethick-Lawrence) होते. लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पॅथीक लॉरेन्स हे ब्रिटनमधील प्रसिद्ध राजकारणी आणि महिलांच्या अधिकारासाठी लढणारे नेते होते. हे दोघे एकत्र असताना हा फोटो घेण्यात आला. हा फोटो व्हाईसरॉयच्या घरासमोर घेण्यात आला होता.

महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटांची मालिका (Currency Notes) जेव्हा चलनात आणायचं ठरलं त्यावेळी 1946 सालचा हा फोटो वापरण्यात आला. हा फोटो नोटांवर वापरताना क्रॉप करण्यात आला आणि मग तो वापरण्यात आला. हाच फोटो असलेली नोटांची मालिका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियांने 1996 साली चलनात आणली. त्यानंतर सर्वच नोटांवर गांधीजींचा हाच फोटो वापरण्यात आला.