राष्ट्रवादीत प्रवेश करताच लक्ष्मण माने म्हणाले, भारताची लोकशाही सध्या धोक्यात …

.

मुंबई – लक्ष्मण माने (Laxman Mane) यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पोहोचेल. त्यांचे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

लक्ष्मण माने यांनी पवारसाहेबांची (Shard Pawar)भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आज त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांचे स्वागत करत आहे. गेली अनेक वर्ष लक्ष्मण माने हे राज्यातील भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी काम करत आले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेली ३० ते ४० वर्ष वाड्यावस्त्यांवर जाऊन वंचित घटकांना एकत्र करत आहेत. त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. आदरणीय पवारसाहेबांनी आजवर समाजातील नाही रे वर्गासाठीच अधिक निर्णय घेतले आहेत. समाजात अजूनही असा मोठा वर्ग आहे, ज्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असताना आदरणीय पवारसाहेबांनी अल्पसंख्याक विकास आणि सामाजिक न्याय ही दोन खाती हक्काने मागून घेतली होती. दोन्ही खात्यामार्फत समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केले असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

लक्ष्मण माने यांनी सूचवल्यानंतर ३३ वेगवेगळ्या जातींचा उल्लेख अर्थसंकल्पात करुन त्यांच्यासाठी विशेष तरतूद केली. त्यावेळी महाराष्ट्राचा सामाजिक न्यायाचा अर्थसंकल्प म्हणून तो प्रसिद्ध झाला. त्यावेळी वंचितांपर्यत पोहोचून आम्ही जे काम केले त्यामुळे २००४ साली विक्रमी संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले अशी माहितीही यावेळी जयंत पाटील यांनी दिली.

यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil)यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पद्मश्री लक्ष्मण माने यांनी प्रास्ताविक करताना हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. तसेच छत्रपती शाहू महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षांचे निमित्त साधून ३१ ऑगस्ट रोजी विमुक्त दिन साजरा करायचा आहे. आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत हा मेळावा होईल असे लक्ष्मण माने यांनी जाहीर केले.

भारताची लोकशाही सध्या धोक्यात असून आपला लढा संविधान विरोधी ज्या शक्ती काम करत आहोत. त्यांच्या विरोधात आहे. हा लढा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहनही लक्ष्मण माने यांनी केले. लक्ष्मण माने यांच्यासमवेत विलास माने, नारायण जावलीकर, शारदाताई खोमणे, अशोकराव जाधव यांच्यासह १८ जणांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार राजेश टोपे, आमदार बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.