‘राजसाहेबांनी पवार साहेबांना नास्तिक बोलल्यावर त्यांचा आस्तिक होण्याचा प्रवास सुखावणारा आहे’

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला (Dagdusheth Halwai Ganpati Temple) भेट दिली. मंदिर परिसरात येणा-या भाविक महिलांकरीता स्वच्छतागृह, स्तनपान कक्ष, प्रथमोपचार सुविधा परिसरात कशा प्रकारे उपलब्ध होईल, याविषयी यावेळी चर्चा देखील झाली. त्यानंतर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शरद पवार यांनी गणरायाचे मुखदर्शन घेतल्यानंतर शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा ट्रस्टतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला.

शुक्रवारी दुपारी शरद पवार, दिलीप वळसे पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांसह अनेक मान्यवरांनी या परिसराला भेट दिली. सुरुवातीला मंदिरासमोर असलेल्या भिडे वाडयाची पाहणी करुन सर्व मान्यवरांनी मंदिराच्या मागील बाजूस गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीसमोरील जागेची पाहणी करुन तेथील अडचणी समजून घेतल्या. मंदिर परिसरात येणा-या भाविक महिला, लहान मुले यांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेत त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली.

दरम्यान, या घडामोडींवर आता मनसेचे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी भाष्य केले आहे. राजसाहेब ठाकरे हिंदू (Rajsaheb Thackeray Hindu), हिंदुत्व,देव,धर्म यावर काय बोलले त्यानंतर महाविकास आघाडीचे झाडून सगळे नेते मंदिरात जाताना दिसले..आज आदरणीय पवारसाहेब देखील दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले…राजसाहेबांनी पवार साहेबांना नास्तिक बोलल्यावर त्यांचा आस्तिक होण्याचा प्रवास सुखावणारा आहे. असं ते म्हणाले.