ज्या – ज्या वेळी बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला ते कधीच निवडून आले नाहीत :अजित पवार

मुंबई – फडणवीस तुम्ही आपल्या भाषणात सारखं – सारखं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसैनिक आहेत असा उल्लेख करत आहात. फडणवीस यांना सारखं – सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असे का सांगावं लागतं आहे. आज आमची भूमिका विरोधी पक्षाची आहे. लोकशाहीत हे चालत असतं. सत्ता येत असते जात असते. परंतु फडणवीस तुमचं भाषण ऐकत होतो. तुम्ही शिंदे यांची फार स्तुती  करत आहात. शिंदे सर्वगुणसंपन्न होते तर रस्ते विकास हेच खाते का दिले होते. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जनतेसाठी उपयोगी असणारे खाते एकनाथ शिंदे यांना का दिले नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात केला.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री(Chief Minister) पदाचा विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनपर भाषणात बोलताना अजित पवार यांनी आजही सत्ताधाऱ्यांवर जोरदार बॅटींग केली. ११ जुलैला बंडखोर आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. तरीसुद्धा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली गेली. अपात्रतेचे प्रकरण असताना ठराव का घेण्यात आला असा सवालही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी एकनाथ शिंदे व आम्ही राज्यपालांना भेटायचो त्यानंतर सगळे गेल्यावर राज्यपाल काय गप्पा मारायचे हे शिंदे तुम्हाला माहीत आहे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

सध्या राज्यपाल (Governor)अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत असा खोचक टोला लगावतानाच नाना पटोले यांनी राजीनामा दिला त्यानंतर सव्वा वर्ष परवानगी द्यावी म्हणून आघाडीच्यावतीने राज्यपालांकडे मागणी करत होतो. मात्र आता निवड ताबडतोब झाली. इतकी फास्ट घटना पाहायला मिळाली की त्यामुळे राज्यातील लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे असेही अजित पवार म्हणाले.

तुम्ही शिवसेना सोडून गेलात तुमच्यासोबत ४० आमदार गेले. त्यामुळे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. त्यातून काय मेसेज गेला ते लक्षात घ्या. ज्या – ज्या वेळी बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला किंवा करण्यात आला त्यानंतर पक्ष फोडणारा कधी निवडून आला नाही ही वस्तुस्थिती आहे हे उदय सामंत (Uday Samant) व गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) तुम्ही लक्षात ठेवा असे अजित पवार यांनी दोघांचे नाव घेत भविष्यातील घटनेचा सुतोवाच केला.

मिरच्या झोंबल्या पाहिजेत असे काहीतरी टाक असे संदीपान भुमरे बोलत असल्याची एक क्लीप बाहेर आली… भुमरे काय मिरच्या झोंबल्या पाहिजेत अशी विचारणा करतानाच मग शहाजीबापूची काय झाडी… आलं… काय हे बापू… अशी टिपण्णी करताना ही मोठी डोकी कधी एकत्र येतील कळणार ही नाही तुम्ही साधे आमदार आहात हे लक्षात घ्या असेही अजित पवार यांनी त्यांना सुचवले.

तिकडे गोव्यात काही आमदार मुख्यमंत्री शिंदे होणार जाहीर झाल्यावर नाचले… काही तर टेबलावर उभे राहून नाचले… आमदार हे योग्य नाही. बंडखोर आमदार कुठुन कुठे गेले हे राज्यातील जनता पाहत होती. अब्दुल सत्तार तर चांगलं बोलले बिर्याणी खायला जातो. पण अजून बिर्याणीबाबत एक चकार शब्द त्यांनी काढला नाही. सुरतला जाताना माझ्याजवळ दोन तास बसले होते हेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.

शिंदे तुम्हाला चांगलं काम करायचं आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) यांना दैवत मानून काम करा. मात्र एक लक्षात घ्या शिवसैनिक हा कधीच नेत्यांसोबत जात नाही तो शिवसेनेसोबतच रहातो हा इतिहास आहे आणि हे चित्र पाहायला मिळेल असा इशाराही अजित पवार यांनी काही उदाहरणे देत दिला.

सध्या राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आले आहे. १०६ आमदारांचे मुख्यमंत्री होत नाही. मात्र ३९ बंडखोरांचे मुख्यमंत्री होतात यात काळंबेरं आहे हे लक्षात ठेवा असा टोला लगावतानाच शिंदे तुम्ही काम करताना मनुष्य स्वभावानुसार जनता तुम्हाला १०६ मुळे मुख्यमंत्री आहात असे बोलणारच हेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येत होते त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते. मात्र उध्दव ठाकरे यांना आग्रह झाल्यावर तुमच्या सगळ्यांच्या जीवावर त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. एकंदरीतच ज्यांच्यासोबत गेलात त्या भाजपने १९८० पासून सेनेच्या मदतीने पक्ष वाढवला आहे. भाजप (BJP)सेनेसोबत (Shiv Sena) राहून ताकद वाढवत गेला आहे. शिंदे तुम्ही आता आपला ग्रुप वाढवण्याचा प्रयत्न करणार आहात तर भाजप आपला पक्ष वाढवणार आहे त्यामुळे हे अंतर्गत भांडण सुरूच राहिल हेही अजित पवार यांनी सांगितले.

तिकडे गेल्यावर ही अनैसर्गिक युती आहे असे बोलत होतात. काहींनी राष्ट्रवादीने अन्याय केला असा पाढा वाचला. मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कधीच भेदभाव केला नाही. आमदारांचा निधी एक कोटीवरुन पाच कोटीवर केला. डोंगरी विकासाचा निधी वाढवला. नगरविकास खात्याला सुरुवातीला ३६१ कोटी दिले त्यानंतर २६४५ कोटी दिले. भेदभाव करणारा माणूस नाही. सर्व खात्याला निधी दिला. फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्हीही मुख्यमंत्री होतात. फायनल हात मुख्यमंत्री फिरवतात याची आठवणही करून देताना राष्ट्रवादीने कधी अन्याय केला नाही. लोकप्रतिनिधींच्या शिफारशीने ४०१ शिवभोजन थाळी केंद्र शिवसेनेला दिली. हे काम केले तर मी उपकार केले नाहीत. सांगायचं तात्पर्य की राष्ट्रवादीने अन्याय केला असा आरोप केला जात आहे मात्र राष्ट्रवादीला(NCP) बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तो योग्य नाही असे सांगतानाच यावेळी अजित पवार यांनी निधी दिला त्याची यादीच सभागृहात वाचली.