पुणे : पुण्यात लोकोपयोगी कामे होत असताना सत्ता आणि संघटन एकत्रित काम करीत आहेत, त्यामुळे शहरात जिथे जाईल तिथे भाजपचेच अस्तित्व जाणवते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी (२५ डिसेंबर) शहर भाजपच्या वतीने अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रचारार्थ तयार करण्यात आलेली पुस्तिकेचे प्रकाधन, बोधचिन्ह आणि पक्षाच्या यूट्यूब चॅनेलचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, माजी आमदार योगेश टिळेकर, बापूसाहेब पठारे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दत्ता खाडे, दीपक पोटे, संदीप लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट म्हणजेच मतदारांशी थेट संपर्क हे भाजपचे पारंपरिक शक्तीस्थळ आहे. मतदारांपर्यंत केंद्र आणि महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि योजना पोहोचवा. त्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान महत्त्वाचे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी ते मनावर घ्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर ते काहीही करू शकतात. पुण्यात चांगले काम केले आहे. लोकांमध्ये सकारात्मकतेची भावना आहे. मागच्या महापालिका निवडणुकीतील रेकॉर्ड तोडून आपण त्यापेक्षा जास्त जागा जिंकू शकतो. त्यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना कार्यरत करण्यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करा.
राणे म्हणाले, पुणेकरांना नागरी सुविधा देऊन, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करा. भाजपचे पुण्यात वर्चस्व आहे. लोकसंपर्क, लोकांचा विश्वास, जागरुकता, नियोजन, जिद्द, निष्ठा आणि प्रामाणिकपणाची जोड यामुळे निवडणुकीत विजय खेचून आणण्याचे कौशल्य प्राप्त करता येते. राजकारणात केवळ आत्मविश्वास कामाचा नाही, तर सैन्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजय मिळेपर्यंत जागरुक राहायला पाहिजे.
पाटील म्हणाले, भाजपचे ३३ हजारहून अधिक कार्यकर्ते २५ डिसेंबरला एकाच दिवसात पुणे शहरातील दीड लाखांहून अधिक घरांत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कार्य घराघरात पोहचविण्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविणार आहेत. केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजना, महापालिकेची विकासकामे घरोघरी पोहोचविली जाणार आहेत या माध्यमातून संघटनचे सक्षमीकरण आणि जनसंपर्क वाढविण्यात येणार आहे.
शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, सहा लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याची योजना करण्यात आली आहे. त्यासाठी मंडल बैठका, प्रभाग बैठका, शक्ती केंद्र बैठका, बूथ बैठका, बूथ समिती बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध योजनांची माहिती देणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. तिचे दीड लाख कुटुंबांमध्ये वितरण करण्यात येणार आहे.
अभियानाचे प्रमुख राजेश पांडे म्हणाले, अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आठ मंडलातील ६० प्रभागप्रमुख, ६०० शक्तीकेंद्र प्रमुख, ३००० बूथप्रमुख आणि ३३ हजार बूथ संपर्क कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. विविध योजना आणि विकासकामांबरोबर कॉल सेंटर, मतदार नोंदणी, यू ट्यूब चॅनेलची माहिती दिली जाणार आहे.