CM Eknath Shinde | आज आषाढी वारीचा सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला साकडं घातलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजीही केली.
पर्यावरणाची वारी सगळ्यात भारी. पर्यावरण राहिले तर आपण राहू. त्यामुळे आपण पर्यावरण वाचवले पाहिजे. मागील 15 वर्षांपासून ही पर्यावरणाची वारी सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरणीय बदल विभागाचे अभिनंदन करतो. एक वारकरी, एक झाड ही संकल्पना आहे. पुढील वर्षी पालखी मार्गावर वृक्षारोपण करतोय. 20 लाख बांबूची रोपे लावणार आहोत. बांबू किती उपयुक्त आहे हे आपल्याला लक्षात आले. आपण फक्त कोणाला बांबू…. तो पण लावावा लागतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने लावावा लागतो. माणसाला पण शेवटी बांबूच लागतो, अशा शब्दांत शिंदेंनी राजकीय फटकेबाजी केली.
तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. वारकऱ्यांसाठीच्या योजना, महामंडळाबात माहिती दिली. तसेच पुढील वर्षी तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून येणार का, या प्रश्नावर पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून यायचे की नाही हे विठुरायावर आणि जनता जनार्दनावर अवलंबून आहे, असे शिंदे म्हणाले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप