अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना सातत्याने डावलले जात आहे. लोकसभेनंतर आता राज्यसभेसाठीही त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. प्रफुल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चा होत्या. परंतु ऐनवेळी त्यांना डावलून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. यामुळे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पुण्यात सूचक वक्तव्य केले.
भुजबळ म्हणाले, ‘मला खासदार होण्याची इच्छा होती. त्यानुसार नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. दिल्लीतून माझे तिकीट अंतीम केले होते. वरिष्ठांकडून मला तसे सांगण्यातही आले होते. त्यानुसार मी कामाला लागलो. एक महिना याबाबत काहीच जाहीर करण्यात आले नाही. नाशिक मतदारसंघातील अर्ज माघारीच्या एक दिवस आधी दुसरे नाव जाहीर झाल्याने अपमान नको म्हणून मी माघार घेतली. त्याचे परिणाम आपल्याला दिसलेच आहेत. अनेकवेळा अशा गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या आहेत, परंतु, ज्या त्या गोष्टी वेळेवर सोडून देत पुढे जावे लागते त्यानुसार माझा प्रवास झाला आहे. मला खासदारकीची संधी दिली नाही, म्हणून त्याचा अर्थ मी नाराज आहे असा त्याचा अर्थ होत नाही.’
राज्यसभेच्या जागेसाठी देखील पक्षांतर्गत वारंवार बैठका झाल्या. सर्वानुमते सुनेत्रा पवार यांचे नाव जाहीर झाले. माझी खासदार होण्याची इच्छा आहेच. परंतु, त्याचा अर्थ मी नाराज आहे, असा होत नाही. विरोधक चुकीच्या बातम्या माध्यमांतून पेरत आहेत. असेही ते म्हणाले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप