संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले ते दोघे कोण ?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यामध्ये संदीप देशपांडे यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर संदीप देशपांडे यांना काल डिस्चार्ज करण्यात आला होता.

दरम्यान, संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दोघेही भांडुप मधील रहिवाशी आहेत. ताब्यात घेण्यात आलेले दोघेही शिवसेना ठाकरे गटाचे असल्याचं समोर येतय. यातील एका व्यक्तीचे नाव अशोक खरात (Ashok kharat) असून हा शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे. भांडुपच्या कोकण नगर विभागचा तो रहिवासी आहे.

तर दुसरा सोलंकी नामक व्यक्ती ही त्याचाच सहकारी असल्याचे समजते आहे. आज सकाळी भांडुप येथील त्यांच्या राहत्या घरातूनन त्यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, खरातविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत तो शांत होता. आता, खरातचे शिवसेना नेत्यांसमवेतचे फोटोही सोशल मीडियातून समोर आले आहेत.