उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून कोण होऊ शकेल महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री? ‘ही’ नावे शर्यतीत आघाडीवर

पुणे – महाराष्ट्राची ताकद एकवटत आहे. मला आनंद आहे. मी बोलू शकतो. रस्त्यावर उतरलो तर काहीही करू शकतो. ही ताकद म्हणजे शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती आहे. शिवशक्ती, भीमशक्ती, लहुशक्ती एकत्र येणार आहे. या तिन्ही शक्तींचा मिळून महाराष्ट्रात आपण मोठी ताकद निर्माण करू शकतो. आपल्या महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी (Women Chief Minister) बसवायची आहे, असे वक्तव्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होऊ शकतात?, तो नवा चेहरा शिवसेना पक्षातीलच असेल? की बाहेरच्या पक्षातील असेल? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या विशेष लेखात आम्ही शिवसेनेतील अशा काही महिला नेत्यांचा आढावा घेणार आहोत, ज्यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी उद्धव ठाकरे विचार करू शकतात. (Maharashtra’s First Women Chief Minister Contestant From Shivsena)

नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe)- 
डॉ. नीलम गोऱ्हे या गेली अनेक वर्षे  शिवसेनेत कार्यरत आहेत. त्या आपल्या अभ्यासू, वैचारिक उंची असलेल्या भाषणांनी शिवसेनेची आणि सामाजिक प्रश्नांची बाजू गेल्या २० वर्षांपासून परखडपणे मांडत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या, पुणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख, मुख्य प्रतोद अशा विविध पक्षाच्या जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडल्या आहे. याबरोबरच त्या विधान परिषदेच्या उपसभापतीही आहेत. शिवसेना पक्षाप्रतीची एकनिष्ठता आणि अनुभवाच्या जोरावर नीलम गोऱ्हे यांचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनण्याच्या शर्यतीत असू शकते.

सुषमा अंधारे (Sushma Andhare)- 
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुषमा अंधारे यांच्या नावाचाही विचार करू शकतात. जुलै २०२२ मध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली गेली. सुषमा अंधारे यांनी फार कमी काळात शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या सातत्याने विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडत असतात. तसेच शिवसेनेची बाजू मांडताना दिसतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री कदाचित सुषमा अंधारेही असू शकतात.

रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray)- 
शिवसेनेतल्या नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे,  प्रियंका चतुर्वेदी अशा महिला नेत्यांनी वारंवार शिवसेनेच्या भूमिका परखडपणे मांडल्या आहेत. त्यात रश्मी ठाकरेंच नाव नेहमीच चर्चेत असतं. रश्मी ठाकरे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर असू शकतात. कारण त्या खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई आहेत. तसेच त्या पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत देखील सहभागी असतात अशी चर्चा आहे.