डीएचएफएल बँक घोटाळ्यात सीबीआयने अटक केलेला अजय रमेश नावंदर नेमका कोण आहे ?

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्या (Bank Scam)प्रकरणी अर्थात 34 हजार कोटींच्या DHFL बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यात अंडरवर्ल्डचा देखील सहभाग असल्याचा संशय वर्तवण्यात येत होता. अखेर या प्रकरणी सीबीआयने (CBI) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद्र इब्राहिमचा हस्तक छोटा शकील याचा निकटवर्तीय असलेला अजय नावंदरला अटक केली आहे.

सीबीआयची या प्रकरणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं मानलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नावंदरने २००० मध्ये नावंदर कन्स्ट्रक्शन ही बांधकाम कंपनी सुरू केली. त्याने काही वर्षांपूर्वी अमरावतीत अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्या ‘स्टेज शो’चेही आयोजन केले होते. नावंदर हा मुंबईत स्थायिक असून त्याचे कुटुंबही मुंबईतच आहे.

गेल्या आठवड्यात सीबीआयने अजय रमेशच्या घरावर छापा टाकला आणि या छाप्यादरम्यान त्याच्या आवारातून 35 कोटींहून अधिक किमतीची चित्रे आणि शिल्पे आणि 1 कोटी रुपयांची घड्याळे जप्त करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयला मिळालेल्या संकेतांनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी कपिल वाधवान आणि त्याच्या साथीदारांनी या घोटाळ्यातील मोठी रक्कम वळती केली होती. यासोबतच या घोटाळ्याच्या पैशातून अनेक जंगम-जंगम मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.
कुरियरचे काम करणारी एक व्यक्ती तीन दशकांमध्ये कोट्यधीश होते. सर्वपक्षीय बड्या नेत्यांसोबत संबंध प्रस्थापित करते, याचे अप्रूप अमरावतीकरांना होते. अजय नावंदर (Ajay Nawandar)हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत होता.आता तो अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याची माहिती समोर येताच, शहरातील त्याच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे. तो दाऊद इब्राहिमचा सहकारी छोटा शकीलचा हस्तक असल्याचे सांगितले जात आहे.