अपघातात एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी जीवाची बाजी लावत ‘तेजस’ला वाचवले होते !

नवी दिल्ली : देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले होते.

डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

बिपिन रावत त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह १३ जणांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. दरम्यान, वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे डायरेक्‍टिंग स्टाफ ग्रुप कॅप्टन वरुण सिंग गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना याच वर्षी म्हणजे २०२१ मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. २०२० सालची गोष्ट आहे. उड्डाणादरम्यान लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजसमध्ये तांत्रिक समस्या आली. असे असतानाही ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी आपले विमान यशस्वीरीत्या वाचवले होते.

संरक्षण मंत्रालयाने त्यादिवशी घडलेल्या घटनेबद्दल सांगितले होते, ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना लवकरच विमानातील समस्या समजली. मग ते लँडिंगसाठी योग्य जागा शोधू लागले. दरम्यान, फ्लाइट कंट्रोल सिस्टम निकामी झाली आणि विमानाचे नियंत्रण पूर्णपणे सुटले. एकामागून एक अशा अनेक समस्या आल्या, ज्या कधीच घडल्या नव्हत्या. विंग कमांडर वरुण सिंग यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रचंड तणाव असतानाही स्वत:ला सांभाळत विमानाचा ताबा पुन्हा मिळवला, आणि वरुण सिंगने आपले उडण्याचे कौशल्य दाखवून लढाऊ विमान वाचवले होते.

You May Also Like