दीड कोटींवरून 13.25 कोटींवर गेलेला हॅरी ब्रूक आहे तरी कोण? पाकिस्तानात ठोकलीत ३ शतके

सनरायझर्सने 13.25 कोटींना विकत घेतलेला हॅरी ब्रूक नाहीये सर्वसाधारण, पाकिस्तानात ठोकलीत ३ शतके

IPL : इंडियन प्रीमियर लीग 2023चा मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) आज (23 डिसेंबर) केरळच्या कोची येथे पार पडला. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता या लिलावाची सुरुवात झाली.

इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) याला लिलावात विकत घेण्यासाठी  सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. हॅरी ब्रूक्स हा इंग्लंडचा उजव्या हाताचा फलंदाज असून तो 1.50 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. त्याच्यावर सर्वप्रथम बेंगलोर आणि राजस्थान या संघांनी बोली लावल्या. पुढे त्याची बोली 5 कोटींपर्यंत गेल्यानंतर हैदराबाद संघानेही त्याला विकत घेण्यात रस दाखवला. शेवटी राजस्थान आणि हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रस्सीखेच झाल्यानंतर अखेर काव्या मारनच्या संघाने त्याला अविश्वसनीय अशा 13.25 कोटींच्या किंमतीत विकत घेतले आहे.

दीड कोटींच्या किंमतीवरून चक्क १३ कोटींवर बोली गेल्याने हॅरी ब्रूक चर्चेत आला आहे. यानंतर इंग्लंडच्या या फलंदाजामध्ये असे काय आहे की, त्याला विकत घेण्यासाठी इतकी स्पर्धा पाहायला मिळालीय़, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

तर मागील वर्षभरापासून इंग्लंडच्या कसोटी व टी20 संघांमध्ये ब्रुक याने स्थान मिळवले होते. विश्वचषक विजेता इंग्लंड संघात देखील त्याची महत्त्वाची भूमिका राहिलेली. नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यात कसोटी मालिकेत त्याने तीन शतके झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले. त्यामुळे या लिलावात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जाण्याची शक्यता होती. केवळ दीड कोटी रुपयांपासून सुरू झालेली त्याची बोली हळूहळू वाढत गेली आणि अखेर सनरायझर्सने राजस्थानला पछाडत 13.25 कोटींचं त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

ब्रुक याने इंग्लंडसाठी आतापर्यंत केव्हा चार कसोटी व 20 टी20 सामने खेळले आहेत. त्याच्या एकूण टी20 कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 99 सामन्यात 148 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.