चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणारा मनोज गरबडे आहे तरी कोण?

Pune – भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे शाईफेक प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीमध्ये शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीचे नाव मनोज गरबडे (Manoj Garbade) असून पोलिसांनी घटनास्थळावरुनच त्यांना ताब्यात घेतलं होतं.

चंद्रकांत पाटील यांनी शाईफेक घटना प्री प्लॅन असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. अशातच चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणारा मनोज गरबडे नक्की कोण आहे?(Who exactly is Manoj Garbade?)., हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी मनोज गरबडेसंदर्भात फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. वागळेंच्या फेसबुक पोस्टमध्ये ऍड. राज जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज गरबडे हा समता सैनिक दलाचा हार्डकोर वैचारिक कार्यकर्ता असून त्याच्या नसानसात आंबेडकरवाद भिनलेला आहे. तो नेहमीच बौद्धेतर लोकांमध्ये आंबेडकरवाद रुजविण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो. जयंतीला केवळ बाबासाहेबांच्या फोटोऐवजी अख्ख्या शहरात त्यांच्या विचारांचे फ्लेक्स लावत असतो. माता रमाई जयंती असो की शिव, शाहू, फुले ते सर्व महापुरुषांचे अनोखे कार्यक्रम राबवण्यात तो सर्वात पुढे असतो.

नुकत्याच पार पडलेल्या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी पिंपरी-चिंचवडमध्ये मनोज गरबडेने ब्लड फॅार बाबासाहेब… थेंब अभिवादनाचा अंतर्गत ५७६ रक्तदानाच्या बॅग जमा करण्यात मोठे सहकार्य केले होते. तसेच हल्लीच संविधान दिनानिमित्त आरएसएस, व्हीएचपी, बजरंग दल, एबीवीपी, युवा सेना या सारख्या कट्टरवादी संघटनांना खुल्या चर्चेत निमंत्रित करण्यातही त्याचे योगदान होते.

याबरोबरच मनोज गरबडे विहारांसोबतच चर्च, मंदिर, गुरुद्वारा, मस्जिद, स्कूल, कॉलेजेसमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन घडवून आणतो. अश्या अनेक आंदोलनात त्याने स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले आहेत. तो कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही. त्याची टीम देखील सदैव त्याच्या पाठीशी असते. तो आंबेडकरी एकजुटीसाठी नेहमीच तळमळ करत असतो. मात्र कायम सामाजिक सलोखा जपण्याचा कसोशीने प्रयत्न करणाऱ्या मनोज गरबडेला आज या सिस्टीमने गुन्हेगार ठरवले आहे.असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.