ना राजकीय पार्श्वभूमी, ना घराणेशाही; ग्रामीण भागातील कार्यकर्त्यावर भाजपने सोपविली मोठी जबाबदारी 

मुंबई : आगामी महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी घडत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील काही पक्ष आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे पक्षाची महत्वाची जबाबदारी देताना दिसत आहेत. त्यातच आता भाजपकडून निष्ठावान कार्यकर्ते प्रवीण अलई यांना आता मोठी जबाबदारी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रवीण अलई (Pravin Alai) यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्ते पदी निवड केली आहे. एक सर्वसामान्य ग्रामीण भागातील कार्यकर्त्याकडे देशातील सर्वात मोठ्या पक्षाची अशा पद्धतीची जबाबदारी देण्यात आल्याने प्रवीण अलई यांचं कौतुक सगळ्या स्तरातून  केलं जात आहे.

ज्या काळात राज्यात सोशल मीडिया खुप कमी प्रमाणात वापरला जायचा किंबहुना अनेकांना सोशल मीडियाची ओळखही नव्हती. त्या काळात भारतीय जनता पार्टीला एका विशिष्ठ उंचीवर नेण्यासाठी अनेक तरुण कार्यकर्ते प्रचंड धडपड करीत होते.  त्यामध्ये प्रवीण अलई यांचं नाव आघाडीवर होतं. याच प्रवीण अलई  यांची आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘प्रदेश प्रवक्ते’ म्हणून नियुक्ती केलीय. देशातील सर्वात मोठ्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश प्रवक्ते पदी निवड हे  खुप मोठं पदं मानलं जातं. ग्रामीण भागातील एक  तरुण कार्यकर्त्याची अशी निवड इतर कार्यकर्त्यांनाही प्रेरणा देणारी ठरली आहे.

प्रवीण अलई यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षातून झाला आहे. अलई यांचे मूळ गाव लोहोनेर ता देवळा जि नाशिक हे आहे.घरची परिस्थिति जेमतेम आणि हालाकीची असताना अल्प शेती उत्पन्न आणि जेवनाच्या पत्रावळी तयार करुण विकत त्यावर माता पित्याने त्यांना घडविले. पुढे वडिलांचा 2003 मध्ये स्वर्गवास झाल्यानंतर नाशिक येथे अत्यंत कमी मानधनावर रुग्णालयात काम करीत जीवन मार्ग शोधित प्रवास सुरु ठेवला. त्यादरम्यान रबरी शिक्के बनवणे, बँक कलेक्शन करून करून त्यांनी आपला उदरनिर्वाह भागविला. त्यानंतर विमा व्यवसाय करण्याकडे वळले. येथे  हळूहळू जम बसवित एक उत्तम विमा सल्लागार बनून सहकार, व्यापारी, वैद्यकीय तसेच वैयक्तिक संबंध जोपासत यश संपादित केले.  याशिवाय सामाजिक क्षेत्रात आग्रभागी राहून कौटुंबिक समस्या निवारण करीत सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत राहिलेत.

राजकीय क्षेत्रात बालपणापासून संघ शाखेत जाणे व शाखा लावणे हे सर्व शिकुन त्यांनी यामध्ये अनुभव घेतले. सन 2013 पासून पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या टीमसोबत त्यांनी उल्लेखनीय कार्य करण्याचा विडा उचलला. त्यानंतर त्यात त्यांनी  सक्रिय सहभाग दर्शवल्याने जिल्हा सोशल मीडिया / प्रसिद्धी प्रमुख, दिंडोरी लोकसभा प्रमुख, विभाग सोशल मीडिया संयोजक/ प्रसिद्धी प्रमुख उत्तर महाराष्ट्र. सोशल मीडिया संयोजक महाराष्ट्र प्रदेश स्तरावर असताना राज्यभर दौरे केले.  या दौऱ्यादरम्यान त्यांच्यांशी सर्वसामान्य कार्यकर्ता कायम स्वरूपी जोड़ला गेला आहे. त्यानंतर  देवेंद्र फडणवीस  यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान संपूर्ण यात्रा दिलेली जबाबदारी पार पाडली. त्यात त्यांनी एक अनुभवाची शिदोरी घेतली.  सर्व राज्यभर सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची खरी धुरा त्यानंतर त्यांच्यावर  होती. त्यास सार्थ न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न त्यांनी केला  यामधून त्यांनी खुप माणसं जोडलीत.आता त्यांच्यावर भाजपने एक मोठी जबाबदारी सोपवली असून ते ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील अशी आशा आहे.