शिंदे गटाच्या मातब्बर नेत्यांना थेट भिडणारा शरद कोळी कोण आहे ? 

मुंबई : जिथे कमी तिथे आम्ही म्हणत सोलापूरच्या शरद कोळीने शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय, गद्दारांना गाडण्याची शपथही पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेंसमोरच घेतली होती यामुळे तो चर्चेत आला आहे. ठाकरे गटाकडून शरद कोळी यांच्यावर युवासेनेचे राज्य विस्तारक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर शरद कोळी अत्यंत आक्रमक शैलीत ठाकरे गटाची बाजू मांडत असून ते सातत्याने शिंदे गटाच्या नेत्यांना अंगावर घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी ५० गाड्यांचा ताफा घेऊन शरद कोळीने मुंबई गाठली आणि शिवसेनेत प्रवेश केला होता.शरद कोळी मूळ मोहोळ तालुक्यातल्या अर्धनगरीचा आहे. शरद कोळीवर सोलापूर ग्रामीण भागातील चार पोलीस ठाण्यात एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. शरद कोळीने धाडस संघटनेच्या माध्यमातून २०१६ पासून सामाजिक कार्य सुरू केलं.सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या वाळू ठेकेदारांना आणि वाळू माफियांना टार्गेट केलं.

अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना जेरीस आणलं होतं. ठेकेदारांविरोधात आंदोलन करणे, माहिती अधिकारातून तपशील काढणे, कारवाई करण्यास भाग पाडणे यामुळे तो चर्चेत आला होता. या माध्यमातून शरद कोळीने अफाट संपत्तीही कमवली, अनेकदा हल्लेही झाले. हल्ले झाल्यामुळे त्याला बंदूकधारी पोलीस संरक्षणही देण्यात आलं,

सोलापुरातील मोहोळ, कामती, मंद्रुप आणि तालुका पोलीस ठाण्यात खंडणी, अपहरण, हाणामारी अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल आहेत. २२ फेब्रुवारी २०१८ रोजी सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई झाली होती. (Who is Sharad Koli?).