भारतीय वंशाच्या नील मोहन यांच्या हाती यूट्यूबची कमान, नेमके कोण आहेत यूट्यूबचे नवे सीईओ?

जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या (You Tube) नवीन सीईओची घोषणा करण्यात आली आहे. यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी नवीन सीईओच्या (YouTube New CEO) नावाची घोषणा केली. कंपनीच्या माजी सीईओ सुसान वोजिकी यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक नील मोहन (Neal Mohan) यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नील मोहन हे यूट्यूबचे पहिले कर्मचारी आहेत, ज्यांना प्रमोशननंतर कंपनीच्या सीईओची कमान देण्यात आली आहे. हे पद मिळाल्यानंतर सोशल मीडियावर नील मोहन ट्रेडिंगमध्ये आहेत. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय उत्सुक आहेत.

कोण आहेत नील मोहन?
भारतीय वंशाचे नील मोहन हे यूट्यूबचे नवीन सीईओ आणि उपाध्यक्ष आहेत. 2008 मध्ये नील यूट्यूबशी जोडले गेले होते. 2013 मध्ये कंपनीने त्यांना 544 कोटी रुपयांचा बोनस दिला होता. यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई हे देखील भारतीय वंशाचे आहेत. 2015 मध्ये त्यांना मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून जबाबदारी मिळाली. त्यांचे कार्य पाहता ते सुरुवातीपासूनच वोजिकीचे उत्तराधिकारी मानले जात होते. वोजिकी त्यांच्यातील नेतृत्व गुणवत्तेने प्रभावित होते.

नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ग्लोरिफाईड टेक्निकल सपोर्टमधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी Accenture मध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी DoubleClick Inc मध्ये 3 वर्षे काम केले. यानंतर त्यांनी सुमारे अडीच वर्षे उपाध्यक्ष बिझनेस ऑपरेशन्सची जबाबदारी सांभाळली. त्यांना मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्याचा अनुभवही आहे. 2008 मध्ये, Google ने DoubleClick विकत घेतले, त्यानंतर नील Google मध्ये सामील झाले.