वडील संघाचे  विश्वासू, मुलगा वीस वर्ष नगरसेवक तरीही काँग्रेस प्रवेश निर्णय त्यांनी का घेतला?

नागपूर : नागपूरातील भाजपचे ज्येष्ठ नेते, संघ मुख्यालय असलेल्या स्मृती मंदिर परिसराजवळच घर, चारदा नगरसेवक आणि उपमहापौर झालेले डॉ. रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. नागपूर शहराचे काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली,  राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, दुग्ध विकास मंत्री सुनील भाऊ केदार यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
विधानपरिषदेसाठी इच्छुक असताना उमेदवारी न मिळाल्याने डॉ. रवींद्र भोयर नाराज झालेत आणि थेट भाजपच्या सस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या अचानक घेतलेल्या या निर्णयाने भाजप आणि संघ वर्तुळात खळबळ उडाली आहे.

साधारणतः ऐंशीच्या दशकात नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या तृतीय वर्षासाठी रवींद्र भोयर यांचे वडील वैद्यकीय सेवा द्यायचे. होमिओपॅथीचे तज्ज्ञ म्हणून प्रभाकर भोयर यांची ख्याती होतीच पण एक सच्चा स्वयंसेवक आणि गोरगरीबाचा आधारवड म्हणूनही डॉ. प्रभाकर भोयर यांच्याकडे बघितले गेले. पुढे डॉ. रवींद्र भोयर यांनी तब्बल चार वेळा नगरसेवक पद भूषविले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा मान ठेवून भाजपने उपमहापौर केले. तरीही केवळ नाराजीचे कारण सांगत रवींद्र भोयर यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

तसे बघताविधानपरिषदेसाठी पक्षाने आपला विचार केला नाही म्हणून रवींद्र भोयर यांनी हा निर्णय घेतला असे सांगण्यात येते आहे. परंतु रवींद्र भोयर यांचे बोलणे अनेकांना टोचायचे, त्यामुळे पक्षांतर्गत शत्रूंची संख्या मोठी होती आणि हाच मुद्दा भोवला अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे.

दुसरे कारण असे की, रेशीमबाग प्रभागातून डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर फारच कमी मतांनी विजयी झालेत. त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान काहीसे कमी झाले. कार्यकर्त्याचा गराडा आणि मतदारांची रीघ मंदावली म्हणून डॉ. रवींद्र भोयर यांना भाजपाला सोडचिट्ठी द्यावी लागली,  असे राजकीय तंज्ञ सांगतात.