उद्धव ठाकरे यांनी पीएफआय आणि इस्लामी दहशतवादी संघटनांवर बोलायचे का टाळले?

Mumbai – गणेशोत्सवाप्रमाणेच यंदाचा नवरात्रोत्सव देखील भारतीय जनता पार्टीतर्फे उत्साहात साजरा केला जाणार आहे. ४९ ठिकाणी थेट भाजपतर्फे गरबा, दांडिया आणि भोंडला याचे आयोजन केले जाणार आहे. तसेच भाजपाने विविध मंडळांना पुरस्कृत केले आहे. २४२ मंडळे ३०० ठिकाणी उदे ग अंबे उदे चा नारा भारतीय जनता पार्टी देणार आहे. तसेच भाजपातर्फे मुंबईत ठिकाणी भव्य स्वरुपात १७ ठिकाणी दांडिया, भोंडलाचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी दांडिया फेम कलाकरांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तसेच रंगशारदा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की,  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, दोन वर्षांनंतर तरुण-तरुणी दांडियांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे किमान तीन दिवस तरी दांडियाची १० वाजेपर्यंतची मर्यादा थोडी उशीरापर्यंत करत १२ वाजेपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत यावर निर्णय होईल, अशी आम्हाला आशा आहे. मुंबईकरांना माझे आवाहन आहे की, मुंबईकरांनी आम्ही आयोजित केलेल्या उत्सवात सामील व्हावे.

मुंबई भाजपा आयोजित आणि गोपाळ दळवी यांच्या पुढाकाराने काळाचौकी येथे भव्य मराठी दांडिया उत्सव आयोजित केला जाणार आहे. याठिकाणी सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. यासोबतच आमदार सुनिल राणे हे योगी नगर, कच्छी नगर येथे आयोजित करणाऱ्या उत्सवात दहा हजार जणांचा रोज सहभाग असेल. त्याठिकाणी कलाकार किंजल दवे आपली कला सादर करतील. आमदार प्रवीण दरेकर हे हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यान, बोरिवली पश्चिम येथे कलाकार प्रीति – पिंकी यांच्या उपस्थितीत गरब्याचे आयोजन करतील. खासदार गोपाल शेट्टी आणि पदाधिकारी संतोष सिंग प्रमोद महाजन क्रीडांगण, बोरीवली येथे प्रसिद्ध दांडिया क्विन फाल्गुनी पाठक, तर खा. मनोज कोटक हे कालिदास ग्राउंड, मुलुंड याठिकाणी सुप्रसिद्ध वादक हनीफ असलम, जान्हवी श्रीमनकर, भाविन शास्त्री यांना घेऊन नवरात्रोत्सवाचे आयोजन करतील. आ. अमित साटम हे जूहू येथील JVPD स्कीम येथे दांडियाचे आयोजन करणार आहेत. तसेच आमच्यातर्फे धर्मवीर संभाजी नगर उद्यान, मिलन सब वे येथे अरविंद कुमार आणि गायिका दिपांशी यांना घेऊन दांडियाचे आयोजन करणार आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

माजी नगरसेवक भार्गव पटेल, हॉटेल सहारा स्टार, माजी नगरसेवक विनोद शेलार हे पावटे कंपाउंड, मलाड, आमदार अतुल भातखळकर हे अशोक नगर कांदीवली, आमदार कॅप्टन तमिल सेलवम हे CGS कॉलनी सायन, संतोष मेढेकर हे मेघवाडी जोगेश्वरी, देवांग दवे हे ठाकूर व्हिलेज, दीपक दळवी हे भांडूप, माजी नगरसेवक नील सोमैया हे निलम नगर, माजी नगरसेवक मुरजी पटेल हे शेर ए पंजाब, माजी नगरसेवक मंगेश पवार यांच्यातर्फे आदिशक्ती एकविरा माता क्रीडांगण, भांडूप गाव येथे, तर माजी नगरसेवक महेश पारकर हे शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व येथे गरबा तसेच दांडियाचे आयोजन करणार आहेत. या पत्रकार परिषदेला माजी आमदार राज पुरोहित, अतुल शाह आणि मुंबई महापालिकेचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे उपस्थित होते.

 

कौआ हंस की चाल नहीं चल सकता, उद्धव ठाकरेंना अॅड. आशिष शेलारांचा टोला

अमित शाह यांना आव्हान देण्याआधी उद्धवजी ठाकरे यांनी स्वतःचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अमित शाह यांना आव्हान देण्याआधी उद्धवजींनी आरसा घेऊन उभे राहण्याची गरज आहे. आपण ज्यांना आव्हान देतोयत त्यांच्या ताकदीसमोर आपण कुठे उभे आहोत, हे त्यांना कळेल. स्वतःच्या हिंमतीवर तुम्ही एकदातरी महाराष्ट्रात सरकार आणले आहे का? तुम्ही शिवसेनेचे १०० आमदार तरी निवडून आणले आहेत का? १०० सोडाच पण ७५ चा आकडा तरी कधी पार केला आहे. ज्या अमित शहांनी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एकदा नाही तर दोनदा शंभर आमदार निवडून आणले, त्यांना तुम्ही आव्हान देतात म्हणजेच सुर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे सांगत कौआ हंस की चाल नहीं चल सकता  असा उपरोधिक टोला अॅड. आशिष शेलार यांनी लगावला.

 उद्धव ठाकरे यांनी पीएफआय आणि इस्लामी दहशतवादी संघटनांवर बोलायचे का टाळले?

PFI प्रकरणात पुण्यात जी घोषणाबाजी झाली, त्या वर्तणुकीला ठेचून काढलं पाहीजे, अशी आमची भाजपाच्यावतीने गृहमंत्र्यांकडे मागणी आहे. ते देखील या मागणीप्रमाणे निर्णय घेतली, अशी अपेक्षा आहे. PFI वर जी कारवाई केंद्रीय यंत्रणांनी केली आहे, ती योग्यच आहे. ज्यापद्धतीने या देशात देशविघातक वातावरण निर्माण करण्याचे जाळे विणले जाते, त्याविरोधात हा लढा आहे. ज्या ज्या वेळी देश बलवान होतो, त्यावेळी देश विघातक शक्ती स्वतःची नखं दाखविण्याचे प्रयत्न करतात. आम्हाला आनंद आहे की, केंद्र सरकारने यांना उखडून टाकण्याचे ठरविले आहे. या कारवाईला आमचे समर्थन आहे. पटना असो किंवा माननीय मोदीजींची सभा असो.. मोदींजींना लक्ष्य करणारे बोलणारे सगळेच कधी कधी देशाच्या स्वाभिमानाचा त्यांना विसर पडतो. काल परवा हजार – दोन हजार लोकांसमोर एनएसईमध्ये उद्धवजी ठाकरे यांनी एकपात्री प्रयोग केला. त्या सभेत पीएफआय किंवा तत्सम दहशतवादी इस्लामी संघटनांवर बोलण्याचे त्यांनी का टाळले? याचे उत्तर ते देतील का, असा प्रश्न आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला.

आदित्य ठाकरे प्रकल्पविरोधी आहेत

कोस्टल रोडसाठी चेन्नईमध्ये मुलाखती घेण्यात आल्या, हे देखील खोटे आहे. आदित्य ठाकरे यांनी सध्या चहा ऐवजी इतर पेय घ्यायचे ठरविलेले दिसते. ते पेय योग्य आणि सुविधाजनक असेल अशी माझी त्यांना विनंती आहे. एवढे खोटे बोलण्याची गरजच नाही. १ हजार ७२५ लोक मुंबईतील सहा वेगवेगळ्या ठिकाणी कोस्टल बाजूवर काम करण्याची क्षमता असलेले इथेच भरती झाले आहेत. कोस्टल रोडसाठी काम करणाऱ्या इंजिनिअर्सची उपलब्धताच नाही. त्यामुळे प्रकल्प वेळेत पुर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची गरज लक्षात घेता इतर ठिकाणाहून मनुष्यबळ आणण्याचा निर्णय घेण्यात आला. आदित्य ठाकरे वांद्रे – वर्सोवा पुढे बोरीवली-विरार पर्यंतच्या कोस्टल रोडला ते थांबवू पाहत आहेत. आदित्य ठाकरे प्रकल्पविरोधी आहेत. एवढेच आम्ही सांगू इच्छितो, अशी टीका अॅड. आशिष शेलार यांनी केली

आदित्य ठाकरे तुमच्या सरकारने किती टक्के कमिशन घेतले या मुद्दयावर ते जनआक्रोश करु पाहत आहेत. वीज मोफत किंवा कमी दरात देण्याचे धोरण असताना टक्केवारी मागितली गेली, जो प्रकल्प महाराष्ट्रात कार्यान्वयितच झाला नव्हता, तो गुजरातला गेला कसा? चर्चा आणि पायाभरणीमध्ये किती टक्क्यांची वाटाघाटी तुम्ही केली, याचे उत्तर दिले पाहीजे. आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन सेनेची भूमिका महाराष्ट्रातील मराठी मुलांना धांदात फसविणे आणि अमराठी गुजराती माणसाबद्दल द्वेष निर्माण करणारी आहे. जनतेच्या मनात याबद्दल आक्रोष आहे.