रेल्वेच्या पटरीला कधीही गंज का लागत नाही? लोखंड नव्हे तर ‘या’ धातूपासून बनतात रेल्वे ट्रॅक

Railway Tracks: रेल्वेमधून (Train/Railway) प्रवास करताना तुम्ही रेल्वेचे ट्रॅक्स पाहिले असतील. या ट्रॅक्सवरुन रेल्वे धावते. भारतीय रेल्वे (Indian Railway) हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. हे रेल्वे ट्रॅक देशभरात सुमारे 67,000 किमी पसरलेले आहेत. मात्र रेल्वे ट्रॅक नेहमी उघड्यावर असतात. ते हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा प्रत्येक ऋतूचा मारा सहन करतात. ते कधीही गंजत नाहीत, हे तुमच्या लक्षात आले असेल.

ट्रॅकच्या आजूबाजूला गंज असू शकतो, परंतु वरचा भाग नेहमी चमकणारा दिसतो. ट्रॅकच्या या भागावर कधीही गंज येत नाही. असे का घडते? याचा कधी विचार केला आहे का? चला जाणून घेऊया रेल्वे ट्रॅक कशापासून बनलेले असतात, ज्यामुळे त्यांच्यावर गंज येत नाही…

लोखंड नेहमी गंजते
लोखंडापासून (Iron) बनवलेल्या वस्तू जेव्हा हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांना गंज लागतो. हवेशी संपर्क झाल्यानंतर त्या वस्तूवर तपकिरी रंगाचा थर जमा होतो. हा लोह ऑक्साईडचा थर असतो. गंज कोणत्याही वस्तूवर थरांच्या स्वरूपात जमा होतो. थर वाढल्याने गंजण्याची व्याप्तीही वाढते. रेल्वे ट्रॅक हे लोखंडाचे बनलेले असतात, असा अनेकांचा समज आहे. लोखंड उघड्यावर ठेवले तर त्याला गंज लागतो, पण रेल्वे ट्रॅकला गंज लागत नाही. मग ते कशाचे बनलेले असतात?

ट्रॅकवर गंज का नाही लागत?
रेल्वे ट्रॅक एका विशिष्ट प्रकारच्या स्टीलपासून बनवले जातात. ज्याला मॅंगनीज स्टील (Manganese Steal) म्हणतात. त्यात 12% मॅंगनीज आणि 0.8% कार्बन आहे. ट्रॅकमध्ये हे धातू असल्यामुळे त्यावर लोह ऑक्साईड तयार होत नाही आणि ट्रॅकवर गंजही येत नाही. जर ट्रॅक लोखंडी बनवलेले असते तर पावसात त्यात ओलावा राहिला असता, त्यामुळे ते गंजले असते.

गंज लागल्यानंतर ट्रॅक कमकुवत झाले असते आणि ते वारंवार बदलावे लागले असते. ट्रॅक कमकुवत असल्याने अपघाताचा धोकाही अधिक होता. म्हणूनच अशा धातूचा वापर ट्रॅक बनवण्यासाठी केला जातो, ज्याला गंज येत नाही आणि ते खूप मजबूत देखील आहे.