अजित डोवाल यांच्या नुसत्या नावानेच शत्रूच्या गोटात खळबळ का माजते?

विनीत वर्तक : ‘जेम्स बॉण्ड’ या नावाचं एक काल्पनिक पात्र इयान फ्लेमिंग यांनी १९५३ साली जगापुढे आणलं. ब्रिटिश गुप्तचर संघटना एम.आय. सिक्स मधील ००७ हा कोड नंबर असलेला हा गुप्तहेर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला. जेम्स बॉण्ड या पात्राने गुप्तहेरांना एक वेगळीच उंची दिली. जेम्स बॉण्डकडे एखाद्या गुप्तहेरासाठी लागणारे सर्व गुण होते. अद्ययावत आयुधं आणि लढण्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता, कोणालाही भुरळ पाडेल असं व्यक्तिमत्व यांसोबत माणसांचं आणि परिस्थितीचं योग्य आकलन, निर्णय क्षमता, योग्य संधीची वाट बघणं अश्या अनेक गुणांनी संपन्न असा गुप्तहेर जगाच्या सगळ्याच कोपऱ्यात सर्वश्रेष्ठ मानला गेला. म्हणूनच प्रत्येक देशातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेराचं जेम्स बॉण्ड असं नामकरण करण्यात येतं.

पाकिस्तानसारखा शत्रू देश भारताच्या एका गुप्तहेराला ‘जेम्स बॉण्ड’ असं म्हणतो. ज्याच्या नुसत्या नावाने शत्रूच्या मग तो पाकिस्तान असो वा चीनच्या गोटात खळबळ माजते, असं म्हणतात की सगळीच युद्धं सैन्याने जिंकता येत नाहीत, काही युद्धं पडद्यामागून जिंकली जातात. पडद्यामागची मुत्सद्देगिरी, शत्रूची बलस्थानं, त्याची कमजोरी, त्याचं लक्ष्य, त्याची हालचाल आणि त्याच्या मनात काय आहे? हे सर्व जर आपण जाणून घेऊ शकलो तर योग्य वेळी खेळलेले डावपेच बंदूक न उचलताही जिंकले जाऊ शकतात. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर भारत-चीन दरम्यान झालेला डोकलाम वाद. जिकडे पडद्यामागून चाली खेळल्या गेल्या आणि प्रत्यक्ष युद्ध न होता चीनला माघार घ्यावी लागली. डोकलाम वाद असो वा सर्जिकल स्ट्राईक, तहाची बोलणी असो वा गुप्तचर अश्या सगळ्याच पातळ्यांवर भारताच्या एका गुप्तहेराने शत्रूला नेहमीच पाणी पाजलेलं आहे, ती व्यक्ती म्हणजेच भारताचे सुरक्षा सल्लागार ‘अजित डोवाल’.

भारताचे सिक्रेट एजंट म्हणून गुप्तपणे त्यांनी पाकिस्तानात ७ वर्षं वास्तव्य केलेलं होतं. पाकिस्तानात राहून दाऊद इब्राहिमच्या हालचालींची माहिती एकत्र करून भारतीय सुरक्षा यंत्रणांना त्यांनी पुरवलेली आहे. पाकिस्तानात लाहोरमध्ये त्यांनी गुप्तपणे वास्तव्य केलं होतं. त्यांच्या टोचलेल्या कानाची गोष्ट अनेकांना माहित असेलच. पण याही पलीकडे त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग सुवर्ण मंदिरामधील ऑपरेशन ब्लॅक थंडरमध्ये होता. सुवर्ण मंदिरात खलिस्तानी प्रमुख आणि ३०० अतिरेकी जवळपास ३ महिने लपले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याआधी त्यांच्याकडील शस्त्रसज्जता जाणून घेणं अतिशय महत्वाचं होतं. याच वेळी अजित डोवाल यांनी रिक्षाचालक बनून सुवर्ण मंदिराच्या आसपास टेहाळणी करायला सुरूवात केली. आपण आत लपलेल्या अतिरेक्यांच्या नजरेत आलो पाहिजे असा त्यांचा प्लॅन होता.

त्यांना जे अपेक्षित होतं तसंच झालं. आत लपलेल्या अतिरेक्यांच्या नजरेत हा रिक्षावाला आला. त्याला पकडून आत नेलं. पकडल्यावर त्यांनी आपण पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय.एस.आय. चे एजंट असल्याचं सांगितलं. आपल्याला पाकिस्तानी संघटनेच्या बॉसने खलिस्तानची मदत करण्यासाठी सुवर्ण मंदिरात पाठवलं असल्याचं त्यांने सांगितलं आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी झाले. विश्वास संपादन करून त्यांनी आत चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती टिपली. शस्त्र कुठे ठेवली आहेत? किती अतिरेकी आहेत? कुठे त्यांची सज्जता आहे तर कुठे ते कमकुवत आहेत अश्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर बाहेर येऊन ती भारतीय गुप्तचर यंत्रणांना दिली. त्यांच्या माहितीच्या आधारानेच ऑपरेशन ब्लॅक थंडर हे आखलं गेलं आणि यशस्वी झालं.

अजित डोवाल यांची पडद्यामागच्या सूत्रधाराची भूमिका ही फक्त हेरगिरीपुरती मर्यादित नाही तर त्यांच्यात असलेले अनेक अंगभूत गुण त्यांना जेम्स बॉण्डची उपाधी योग्य असल्याचं सांगतात. देशाच्या सुरक्षिततेत गेल्या ३०-४० वर्षांत त्यांनी दिलेलं योगदान हे अमूल्य राहिलेलं आहे. कुठे काय बोलायचं? कुठे तोंडाची भाषा वापरायची तर कुठे हत्यारांची ह्या सर्व गोष्टीची पुरेपूर जाण असलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे.

‘ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी’…

भारताच्या पाकिस्तानच्या बाबतीतल्या या बदललेल्या भूमिकेमागे अजित डोवाल असल्याचं म्हटलं जातं. ज्या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान हादरला त्याची कल्पना आणि संपूर्ण आखणी अजित डोवाल यांची होती. जून २०१४ मध्ये इराकमध्ये अडकलेल्या ४६ भारतीय नर्सेसची सुटका करण्यामागे अजित डोवाल ह्यांची मुत्सद्देगिरी महत्वाची होती. अजित डोवाल ह्यांच्याकडे या अतिशय गुप्त मिशन (Top Secret Mission) ची जबाबदारी देण्यात आली होती. अजित डोवाल ह्यांनी इराकमध्ये गुप्तपणे जाऊन इराक सरकारच्या अतिशय वरच्या स्थानावर असणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून ह्या नर्सेसच्या सुटकेसाठी पडद्यामागून सूत्रं हलवली होती.

अजित डोवाल ह्यांना भारताच्या आजवरच्या सगळ्या १५ विमान अपहरणाच्या घटना सोडवण्याचा अनुभव आहे. ह्या सगळ्या विमान अपहरण घटनांना योग्य रित्या सांभाळून भारतीय नागरिकांची सुटका करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे. भारताच्या पूर्वेकडील प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यात फिल्ड एजंट म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. इथल्या लालडेंगा ह्या अतिरेकी संघटनेच्या ७ पेकी ६ कमांडरना मारण्यात तेच पडद्यामागचे सूत्रधार होते. ह्यानंतर ह्या अतिरेकी संघटनेच्या प्रमुखाने भारत सरकारसोबत शांती करार केला होता. डोकलाम विवादात चीनच्या सैन्याला संयमी पण त्याच वेळी ताकदीने उत्तर देऊन हा प्रश्न चर्चेने सोडवण्यात त्यांची पडद्यामागची भूमिका महत्वाची होती. म्यानमार इकडे आर्मी चीफ सोबत सैनिकी ऑपरेशन करताना त्यांनी ५० पेक्षा जास्ती अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात पडद्यामागचे सूत्रधार तेच होते.

भारताच्या या जेम्स बॉण्डची ताकद किंबहुना त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या कार्यामुळे प्राप्त झालेल्या वलयाची दखल जगानेही घेतलेली आहे. अफगाणिस्तानमध्ये सद्यस्थितीला चालू असलेल्या तालिबान संघर्षात तोडगा काढण्यासाठी अमेरिका, रशिया, इस्राईल, इंग्लंडच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्यांनी गेल्या काही आठवड्यांत त्यांच्या भारतात येऊन घेतलेल्या गाठीभेटी भारताच्या जेम्स बॉण्डचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करतात.

अजित डोवाल पहिले पोलीस अधिकारी आहेत, ज्यांना अतुलनीय शौर्यासाठी भारताच्या शांतीकाळात देण्यात येणाऱ्या दुसऱ्या सर्वोत्तम शौर्य पुरस्कार किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे (१९८८). आय. बी. चे डायरेक्टर पदावरून २००५ साली निवृत्त झाल्यावरसुद्धा २०१४ साली त्यांनी पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. गेल्या ७ वर्षांत भारताला सुरक्षित ठेवण्यात त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. जम्मू-काश्मीर मधील ३७० कलम हटवल्यानंतर तिथली परिस्थिती अतिशय संयमाने हाताळण्यात पडद्यामागचे सूत्रधार हे अजित डोवाल राहिलेले आहेत.

पडद्यामागून देशाच्या सुरक्षिततेत योगदान देणाऱ्या भारताच्या जेम्स बॉण्ड म्हणजेच अजित डोवाल यांना कडक सॅल्यूट. येणाऱ्या काळात त्यांचा अनुभव आणि त्यांची सेवा भारताला सुरक्षित ठेवण्यात महत्वाची असणार आहे.

जय हिंद!!!

हे हि पहा :