नांदेड :- मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांसमवेत अलिकडच्या काही वर्षात रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांबाबत अक्षम्य दिरंगाई होत आहे. भोकर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम हे त्या दुजाभावाचे प्रतिक आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे सर्व सामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजुला वाहतुकीची होणारी कोंडी तर दुसऱ्या बाजुला रेल्वे विभागाकडून कामामध्ये केली जाणारी दिरंगाई ही न समजण्यापलीकडची आहे. दक्षिण मध्य रेल्वेची मराठवाड्याच्या विकासाकडे पाहण्याची दृष्टी दुजाभाव करणारी असल्याची संतप्त भावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव-तामसा-भोकर-उमरी रस्त्याच्या रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतूकीस आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार अमिता चव्हाण, भोकरचे नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांबाबत व्यापक भूमिका घेणे गरजेचे असून याबाबत लवकरच रेल्वे मंत्रालय, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मी चर्चा करेल असे त्यांनी स्पष्ट केले. भोकर येथील आज उद्घाटन झालेल्या उड्डाण पुलाला सन 2016 मध्ये मान्यता प्रदान केली गेली. अनेक वर्षे हे काम प्रलंबित होते. या प्रलंबित असलेल्या कामाला मागील 2 वर्षात युद्ध पातळीवर गती देऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला करतांना मला आत्मिक समाधान असल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. याचबरोबर ज्या सर्वसामान्य जनतेनी संपूर्ण गावाला वळसा घालून इतके वर्षे त्रास सहन केला त्यांच्याप्रती शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केली. या पुलाच्या भुयारी मार्गाची पुर्तता येत्या 3 महिन्यात करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भोकरच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. लवकरच येथे 100 खाटाचे रुग्णालय आपण उभारत आहोत. न्यायालयाची स्वतंत्र इमारत तयार करुन जनतेच्या प्रशासकीय सुविधेसाठी दर्जेदार कामे आपण करीत आहोत. या तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर स्वरुप धारण करतो. याची मला कल्पना असून त्याबाबतही आमचे नियोजन सुरू असून सुधा प्रकल्पाची उंची वाढवून अधिक पाणीसाठा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन उंची वाढविण्यास शासनाची मान्यता मिळाल्याचेही त्यांनी जाहीर केले. यातून सर्वच गावांचा प्रश्न सुटेल असे नाही तर सुधा प्रकल्पासमवेत पिंपळढव प्रकल्पालाही आपण चालना देत असल्याचे त्यांनी सांगून पाणी पुरवठ्याच्या प्रलंबित प्रकल्पांना मार्गी लावू असे स्पष्ट केले.
राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक बिकट आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आमाप नुकसान झाले. अशावेळेस महाविकास आघाडी शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना दर हेक्टरी पूर्वी जी 6 हजार 800 रुपये आर्थिक मदत मिळायची यात भरघोस वाढ करुन ती मदत आम्ही 10 हजार रुपये हेक्टरी पर्यंत वाढविली. यात शेतकऱ्यांचे इतर प्रश्न आमच्या निदर्शनास आले. पिक विमा योजनेच्या नावाखाली एरवी शेतकऱ्यांची जी दिशभूल केली गेली ती होऊ नये यावर प्रशासनाला दक्ष राहण्यास सांगितले. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी आपण जवळपास 1100 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवू शकलो. यात पिक विमा योजनेचे 550 कोटी रुपये हे संपूर्ण महसूल यंत्रणा दक्ष ठेवून त्या विमा कंपनीकडून आपल्याला घेता आले. तथापि पिक विमा योजनेतून मिळणारी भरपाई ही नगण्य असून राज्य शासनाच्या धर्तीवर ही सुधा हेक्टरी 10 हजार रुपयापर्यंत कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नात असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
या रेल्वे उड्डाण पुलाच्या वाहन मार्गाची रुंदी 7.5 मिटर असून एकुण लांबी 874 मिटर इतकी आहे. एकुण मान्यता 40 कोटी रुपयाची असून सार्वजनिक बांधकाम विभागाने 32.16 कोटी रुपयाचा निधी व तांत्रिक मान्यता प्रदान केली.
कामाचा दर्जा व वेळेवर कामाची निर्मिती यात कोणतीही तडजोड नाही
विकास कामांना मिळणारा निधी हा अनेक आव्हानातून मिळावावा लागतो. ज्या विकास कामांसाठी आपण हा निधी आणलेला आहे त्या कामांवरच हा निधी कामातील गुणवत्तेसह दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण करुन घेऊन खर्ची घालणे हे प्रत्येक विभाग प्रमुखांचे कर्तव्य आहे. रस्ते विकासासह इतर कामात जर काही गडबड आढळली तर खुशाल आमच्याकडे तक्रार करा आम्ही वेळेवर त्याचा बंदोबस्त करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
आज सकाळी त्यांच्या हस्ते पिंपळढव येथे नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन व इतर विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
https://youtu.be/FkhUTw1OjTM