दोन्ही कर्जमाफी योजनांमधून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का ? – नाना पटोले

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्यात २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व २०१९ साली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु या दोन्ही कर्जमाफी योजनांमध्ये काही पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे का ? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित करताना नाना पटोले म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी योजना राबवताना दोन्ही योजनामधून काही शेतकरी पात्र असतानाही त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. नियमित भरणा करणा-या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याची घोषणा केली होती तसेच ज्यांचे कर्ज २ लाखांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचाही पर्याय दिला होता.

यातूनही काही पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना लाभ मिळेल का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेबद्दल काही तक्रारी नाहीत आणि या कर्जमाफी योजनेचे उदिष्ट्य सरकार पूर्ण करेल असे उत्तर दिले.