हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढणार? ‘या’ निर्णयामुळे BCCI मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने रणजी स्पर्धेतून माघार घेतल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. रणजी स्पर्धेसाठी बडोदा क्रिकेट असोसिएशनने २० सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात हार्दिक पांड्याच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही. देशांतर्गत प्रतिष्ठित मानली जाणारी रणजी क्रिकेट स्पर्धेतून पांड्याने अचानक माघार घेतल्याने या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

हार्दिक पांड्या संघात नसल्याने बडोदा संघाने केदार देवधरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. १० फेब्रुवारीपासून रणजी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी रणजी स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे अनेक खेळाडू या स्पर्धेत कठीण मेहनत घेताना दिसतात.

भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी हार्दिक पांड्या सध्या व्हाईट बॉल क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सांगितले होतं की, देशांतर्गत स्पर्धेत दमदार कामगिरी करा, आणि भारतीय संघात प्रवेश मिळवा. गांगुलीच्या या निर्णयाला पांड्याने केराची टोपली दाखवल्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रणजी स्पर्धेतून माघार घेण्याची चूक पांड्याला महागात पडू शकते.

गेल्या काही वर्षांपासून हार्दिक पांड्याच्या कामगिरीकडे सर्वांच लक्ष लागून आहे. टी -२० विश्वचषक स्पर्धेपासून तो संघाबाहेर आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून भारतीय संघ अष्टपैलू खेळाडुंची देखील सध्या चाचपानी करीत आहे. फिटनेसमुळे पांड्याने भारतीय संघाकडून २०१८ साली शेवटचा कसोटी सामना खेळला होता.