लेखक विचारवंतांना राजकारणाची खाज का? प्रा.हरी नरके शिवसेनेचे प्रवक्ता होणार का?

पुणे – लोकशाहीच्या युगात बोलण्याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेला हक्क आहे. मत मतांतरे व्यक्त करणं आणि चुकीच्या प्रवृत्तीवर प्रहार करणं हा एक व्यक्तिस्वातंत्र्याचा भागच म्हणावा लागेल. पण व्यवस्थेच्या नावाखाली वास्तववादी भुमिका बाजुला ठेवुन आपणच फार पुरोगामी विचाराचे पाईक आहेत असं म्हणत काही लेखक राजकिय पक्षावर विचार मांडतात. तेव्हा प्रश्न असा पडतो की ही मंडळी राजकारणात थेट प्रवेश का करत नाहीत? प्रख्यात संशोधक, लेखक प्रा.हरी नरके (Hari Narke) नुकतेच मराठवाड्यात  येवून गेले. जाहिर कार्यक्रमात त्यांनी मांंडलेले विचार अराजकिय वाटले पण लागल्या सवयीप्रमाणे देशात वर्तमान राजकिय परिस्थिती असुरक्षित असल्याचे भाष्य केले. एखाद्या पक्षाच्या अंतर्गत राजकारणावर लेखक जेव्हा तोंडसुख घेतात नव्हे तर आपण विरोधी पक्षाचे प्रवक्ते आहोत या आविर्भावात थेट पक्ष नेतृत्वावर हल्ला चढवतात. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आयत्या पीठावर रेगोट्या ओढणारं नेतृत्व याचाच अर्थ सर्व मान्य नेत्याच्या विरोधात केवळ प्रसिद्धीसाठी काहीतरी लिखित बरळावं ज्यामुळे वाढत्या वयात आपलं नाव झळकेल अशी समजुत असु शकते. त्यापेक्षा राजकारणाची खाज असलेल्या लेखकांनी एखाद्या पक्षाची किंवा त्या नेतृत्वाची चमकोगिरी करताना दुसर्‍या पक्षाच्या नेतृत्वावर टिका करण्यापेक्षा थेट शिवसेनेत प्रवेश करून प्रवक्ता पद का घेवु नये? असा सवाल आता हितचिंतक, वाचक हरी नरके यांना करताना दिसते. असं भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी (BJP spokesperson Ram Kulkarni) यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात, प्रा.हरी नरके एक विचारवंत आणि प्रसिद्ध लेखक म्हणुन ओळखले जातात. त्यांचं वक्तृत्व आणि मांडत असलेले विषय सामाजिक जनजागृतीसाठी शिवाय नव्या पिढीला काही आदर्श सांगण्यासाठी तितकेच महत्वाचे आहे. कितीतरी पुस्तकाचे लिखाण त्यांनी केलेले असेलच. परवा लातुर-अंबाजोगाईच्या दौर्‍यावर आले असताना जाहिर वक्तृत्व ऐकण्याचा योगही आला. व्यवस्थेच्या नावाखाली वर्तमान सामाजिक आरोग्य कसं बिघडलेलं आहे? हे सांगताना त्यांना सद्याच्या राजकिय परिस्थितीत देशात सर्व स्तरावर झालेलं परिवर्तन हे का दिसत नाही? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना (Dr. Babasaheb Ambedkar) भारतात ज्ञान मिळाले नाही पण अमेरिका, तथा इंग्लंड आदी ठिकाणी त्यांनी अल्पावधीत मिळवलेलं ज्ञान ज्याचं श्रेय चांगल्या शिक्षकाला जातं. हे सांगण्याच्या प्रयत्नात हरी नरकेंना देशातील सद्याच्या राजकिय व्यवस्थेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा विचार पुढे घेवुन जाण्यासाठी सद्यस्थितीत इंग्लंडमधील त्यांचं निवासस्थान खरेदी केलं. मुंबईत त्यांचं भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक बांधकामाला प्राधान्य दिलं. हे हरी नरके यांना का सांगावं वाटत नाही?

एवढेच नव्हे तर तत्कालीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसवाल्यांनी दिलेला त्रास हे पण सांगायला पाहिजे. असो. शेवटी विचारवंतांचं ज्ञान आणि त्यांची बुद्धी क्षमता वेगवेगळ्या वैचारिक पातळीवर चालते तो भाग वेगळा. हरी नरके यांनी भाजपला (BJP) शिवसेना संपवायची आहे सोशल मिडियावर या मथळ्याखाली मांडलेले विचार म्हणजे भविष्यात हरी नरके निश्चित शिवसेनेचं मांडलीकत्व किंवा प्रवक्ते पद स्विकारतील हे लक्षात येतं. देवेंद्र फडणवीस यांना आपल्या लिखाणात आणि बोलण्यात ते लक्ष्य करतात. मग शिवसेनेला पाच वर्षे अपमानित केले. काश्मिरमध्ये मुफ्तीसोबत युती किंवा राज्यात अंधारात केलेला शपथविधी हे विचार म्हणजे एखाद्या लेखकाचे नव्हे तर चक्क पुण्यात बसुन शिवसेनेचा प्रवक्ता बोलण्यासारखेच म्हणावे. खरं तर विचारवंतांनी स्वत:ला राजकिय क्षेत्रापासुन चार हात दुर ठेवणे महत्वाचे. पण राजकारणाची खाज अनेकांना असते. त्यापैकी हे एक म्हणावे. भाजपात गल्ली ते दिल्ली एकही नेता त्यांना चांगला वाटत नाही. ज्या किरीट सोमय्यांनी भ्रष्ट व्यवस्थेवर आवाज उठवला खरं तर अशा विचारवंतांनी किमान त्यांचं स्वागत करायला हवं. शिवाय मिडियाला व्यापारी म्हणायचं हाही अतिरेक करायला नरके मागे राहिले नाहीत.

वास्तविक पहाता माध्यमे लोकशाहीचा प्रमुख घटक ज्याला एखादा विचारवंत टिकेचं लक्ष्य बनवतो हे दुर्दैव म्हणावे लागेल. देवेंद्र फडणवीसांनी राज्यात सामाजिक प्रश्नावर लक्ष्य घालताना मराठा आरक्षण तथा ओबीसी आरक्षण (OBC reservation) यासारखे प्रश्न अजिंड्यावर ठेवले. याउलट हरी नरकेंना राजकारणातले काही नेते अगदी कर्तृत्ववान वाटतात. त्याच मंडळींनी सत्तेत असताना आरक्षण लोंबकळत ठेवले. त्याला जाब विचारायला लेखक हरी नरके तयार नाहीत याला काय म्हणावं? त्यांच्या तोंडी आणि लिखाणातुन आलेली राजकिय भाषा म्हणजे खरोखर हिंदुत्वाचा पुळका तथा शिवसेनेचे कडवे निष्ठावान सैनिक म्हणुन त्यांचा गौरव करावा असंच म्हणावे लागेल. अगदी संजय राऊतांची (Sanjay Raut) जागा ते घेवु पहातात की काय? असं म्हटलं तरी आश्चर्य नाही.

शिवसेना हिंदुत्वाची बावनकशी सोन्याची कोंबडी ही उपमा त्यांनी दिली. पण मुख्यमंत्री म्हणुन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अडीच वर्षात हिंदुत्व कसं वेशीला टांगुन दिलं? केवळ मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी राज्यात अडीच वर्षे केलेला कारभार याचि देहि, याचि डोळा जनतेनं पाहिला. पण तो हरी नरकेंना बरा का वाटला? याचं आश्चर्य. कदाचित बारामतीमार्गे पुण्याला जात असावेत हेच नक्की. केंद्रिय तपास यंत्रणा, पन्नास खोके, यावरही त्यांनी लिखाणातुन टिका केली. सांगायचं एवढंच आहे लेखक, विचारवंतांनी पडद्यामागुन राजकारण करण्यापेक्षा प्रत्यक्ष राजकिय मैदानात उतरून हौस फेडली तर मग निश्चित कळेल. काय तर म्हणे आम्हाला भाषण केल्यानंतर सुरक्षित जायचं असतं. अरे बाबा, वर्तमान देशाच्या व्यवस्थेत असलेला पर्व काळ हा खर्‍या अर्थाने सार्‍या व्यवस्थेला सुधारणेकडे घेवुन जाणारा आहे. सबका साथ,सबका विकास या सुत्रातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काम करताना अठरापगड जातीधर्माला घेवुन काम करणारा पंतप्रधान शिवाय शेतकरी, कष्टकरी, मजुर यांना प्रगतीच्या प्रवाहात घेवुन येण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यावर लेखक काहीच बोलत नाहीत.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकर्‍यांचा विचार करणारा पंतप्रधान ही ओळख लेखकाच्या मनी पटत नाही हेच आजच्या व्यवस्थेचे दु:ख म्हणावे लागेल. प्रश्न हा पडतो देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.कदाचित तुम्ही त्यांचं अभिनंदन करू नका पण बदलत्या महाराष्ट्रात या नेतृत्वाने जी भुमिका डोळ्यासमोर ठेवुन मागच्या दहा वर्षात काम करून दाखवलं त्याहुन अधिक करोनासारख्या काळात विरोधी पक्षनेता म्हणुन चोवीस तास रस्त्यावर उतरले. त्यावर नरके बोलले नाहीत. उद्धव ठाकरे अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयात दिसले नाहीत. हे त्यांचं झाकुन ठेवण्यासाठी जणु काही नरके एखादी शाल घेवुन फिरताना दिसतात.

मला वाटतं लेखक, विचारवंत यांच्या अंगी व्यक्तीद्वेष असणे, व्यक्तीसापेक्ष मत्सर असणे आणि कुणाची तरी मर्जी राखण्यासाठी टिकेचं लक्ष्य बनवणे हे लेखकाचं काम नव्हे. त्यापेक्षा राजकारणाची खाज जास्त असेल तर धनुष्य-बाण हाती घेतला बरे. कदाचित हरी नरके भविष्यात घेतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण समाजात वावरताना आपला चेहरा अराजकिय दाखवायचा आणि व्यवस्थेच्या नावाखाली सुधारणावाद्याच्या मुखाद्वारे वर्तमान राजकिय व्यवस्था तथा नेत्यांना टिकेचं लक्ष्य बनवायचं तर मग नवोदित लेखक, विचारवंत आपला काय आदर्श घेणार? हा माझा त्यांना सवाल आहे. सद्याच्या राजकिय व्यवस्थेने जो काही देशात आमुलाग्र बदल केला हे पण सांगणं लेखकाचं कर्तव्य असतं. किमान आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यांची लोकप्रियता जगाच्या पाठीवर नंबर एक आहे. एवढं जरी अशा विचारवंतांच्या तोंडुन बाहेर पडलं तर मग सामान्य माणुस तुमच्या बोलण्यावर विश्वास नक्कीच ठेवेल.