पहिली ते चौथीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार ? राजेश टोपे म्हणाले…

मुंबई – राज्याच्या कोरोनाविषयक कृती दलानं प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करायला परवानगी दिली असून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर या शाळा सुरू होऊ शकतील असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या राज्यात डेल्टा प्लस प्रकारचा कोरोना अस्तित्त्वात आहे. नवीन प्रकार आलेला नाही, असंही ते म्हणाले. संपूर्ण लसीकरण हाच सध्या कोरोनावर एकमात्र उपाय आहे. राज्यात आतापर्यंत 10 कोटी 84 लाखांहून अधिक त्रा देण्यात आल्या. आतापर्यंत 80 टक्के लाभार्थ्यांना लशीची पहिली मात्रा, तर 40 टक्के लाभार्थ्यांना लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

ज्या जिल्ह्यांमध्ये कमी लसीकरण झालं आहे, त्या जिल्ह्यात आशा, अंगणवाडी कर्मचारी, आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाचं लक्ष्य देण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले.