ज्या उमेदवाराचा रिमोट कंट्रोल कलंगुट मध्ये आहे अशा उमेदवाराला निवडून देणार का ?; फडणविसांचा हल्लाबोल

म्हापसा – भारतीय जनता पक्षाचे म्हापसा मतदार संघातील उमेदवार जोशुआ डिसुझा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. जो उमेदवार उमेदवार आपला आहे आणि जो खरा लोकप्रतिनिधी आहे अशा जोशुआला आपण निवडून द्यायचं की ज्यांचा रिमोट कंट्रोल कलंगुट मध्ये आहे अशा उमेदवाराला आपण निवडून द्यायचं. हा खरा या निवडणुकीतील सवाल आहे असं म्हणत विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

या कार्यक्रमाला, गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस, म्हापसा मतदार संघातील उमेदवार जोशुआ डिसुझा,देशाध्यक्ष सदानंद तानावडे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, आमदार राम सातपुते, माजी मंत्री दयानंद मांजरेकर,भाजप नेते अभिजित सामंत, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, मंडळ अध्यक्ष सुशांत हरमलकर यांच्यासह भाजप आणि भाजयुमोचे पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, खरतर आज या मतदार संघामध्ये जी लढत चाललेली आहे त्यामध्ये म्हापसेकरांना एकच निर्णय करायचा आहे. जो उमेदवार उमेदवार आपला आहे आणि जो खरा लोकप्रतिनिधी आहे अशा जोशुआला आपण निवडून द्यायचं की ज्यांचा रिमोट कंट्रोल कलंगुट मध्ये आहे अशा उमेदवाराला आपण निवडून द्यायचं. हा खरा या निवडणुकीतील सवाल आहे. काही लोकांना असं वाटतय की आता भरपूर संपत्ती आल्यामुळे त्याच्या जोरावर आम्ही म्हापसेकरांना विकत घेऊ शकतो. आम्ही बार्देशमधल्या सर्वच मतदार संघांवर कब्जा करू शकतो. आणि नंतर त्या ठिकाणी आमचंच राज्य आम्ही चालू शकतो आणि म्हणून त्यांना प्रॉक्सी पाहिजे. सीवोली मधले उमेदवार असो अथवा म्हपश्यातील उमेदवार असो ते उमेदवार नाहीत तर ते प्रॉक्सी आहेत. याठिकाणची जनता हे कधीच सहन करणार नाही हा मला विश्वास आहे. कारण भारतीय जनता पक्षाचा विकास जनतेने पाहिला आहे. गोव्याचं चित्र बदलण्यासाठी बीजेपीने जे प्रयत्न केले आहेत ते जनतेनं पाहिले आहेत. विशेषतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अभूतपूर्व अशी मदत गोव्याला दिली आणि त्यातूनच गोवा हे बदललेलं आहे.

फडणवीस म्हणाले, जोशुआ सारखा एक अतिशय नेता या मतदार संघाला लाभला ज्याने पोटनिवडणुकीत विजय मिळवला. अतिशय छोटा कार्यकाळ त्यांना मिळाला पण या कार्यकाळात देखील त्यांनी उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. मला विश्वास आहे जी परंपरा बाबुश यांनी सुरू केली ती परंपरा पुढे नेण्याचे काम जोशुआ निश्चितपणे करतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सरकार आणायचं आहे ते गोवेकरांच्या विकासासाठी इतर पक्षांना गोव्याचे लचके तोडायचे आहेत. त्यांच्याकरता गोवा ही कमोडीटी आहे पण भारतीय जनता पक्षासाठी गोवा ही कमोडिटी नाही आहे. भारतीय जनता पक्षाकरिता गोवा हे एक आयकॉनिक राज्य आहे. आमच्यासाठी गोवा म्हणजे देशाच्या मुकुटातील रत्न आहे. हे रत्न जागतिक स्तरावर प्रसिद्ध व्हावे या साठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. गोव्यातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला सुखसोयी मिळाव्या आणि त्यांचे प्रश्न सुटावे, तरुणाईला एक चांगली दिशा मिळावी यासाठी आमची पार्टी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. मला विश्वास आहे गोव्यातील जनतेचा आशीर्वाद भाजपला आणि जोशुआला मिळेल अशी फडणवीस म्हणाले.