शिवसेनेला लागलेले गटबाजीचे ग्रहण संपेल का? पक्षप्रमुख शिवसैनिकांचा आवाज ऐकतील का?

करमाळा –  एकेकाळी अक्रमक आंदोलन व निष्ठावंत शिवसैनिकांचा बुलंद आवाज सोलापूर जिल्ह्यात घुमत होता. पंढरपुरचे साईनाथ अंभगराव, संजय घोडके , दत्ता भोसले जयवंत माने ,कुर्डूवाडी चे  प्रकाश गोरे, धंनजय डिकोळे शिवाजीराव सावंत, सोलापूरचे शिवशरण पाटील, उत्तमप्रकाश शिंदे, अजय दासरी,  पुरुषोत्तम बरडे, लहु गायकवाड, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील  प्रकाश वानकर, श्रावण भंवर माळशीरस चे स्व दत्ता आप्पा वाघमारे, करमाळ्याचे स्व शिवाजीराव मांगले, शाहुराव फरतडे, प्रवीण कटारिया, संजय शिंदे, महेश चिवटे  तानाजी जगताप, जितेंद्र सुरवसे ,सचिन जव्हेरी या सेना पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी पक्ष वाढीसाठी जिवाचे रान केले. कधी सायकल, एसटी, मोटारसायकल तर पायी चालत पक्ष वाढीसाठी योगदान दिले.पद प्रतिष्ठा या पेक्षा बाळासाहेबांचा आदेश यांना महत्वाचा होता.

त्यावेळेस मुंबई वरुन येणारे संपर्क प्रमुख देखील एस टी – रेल्वेने प्रवास करायचे. पक्षाची साधी बैठक असली तरी शे-दोनशे शिवसैनिक सहज पणे जमा व्हायचे. जय भवानी, जय शिवाजी, गर्व से कहो हम हिंदू है  ,”आवाज कुणाचा शिवसेनेचा ” या स्फुरण देणाऱ्या  घोषणा व  डौलाने फडकणारे भगवे झेंडे हे पाहून नुकतेच मिसरुठ फुटायला लागलेल्या तरण्या बांड पोरांना शिवसेना म्हणजे जिव की प्राण वाटत होती. आजही वाटत आहे. मात्र खरच शिवसेना पदाधिकाऱ्यांतील असलेला जिव्हाळा, शिवसैनिकांप्रती असलेली तळमळ पहिल्यासारखी राहिली आहे का? याचा अनेक वर्षांपासून पदावर चिटकून बसलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. कारण ऐकमेकांनच्या हातात हात घालून काम करणारी हि मंडळी ऐकमेकांचे पाय खेचण्यात दंग झाली आहे.

पक्षात मिळणारी पदं प्रतिष्ठा कधीच कायमस्वरुपी नसतात याचा विसर काहींना पडला असून पदाची खुर्ची माझ्याच बुडाखाली कशी राहील यासाठी एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरु आहे. शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे पाईक होण्यापेक्षा स्थानिक पातळीवर नेत्यांचे हुजरे होण्यात काहीजण धन्यता मानत आहेत व अशा हुजर्यांची सध्या पक्षात चलती सुरू आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांतील असलेल्या या हेव्यादाव्यामुळे शिवसैनिकांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून असलेले व ऐनवेळेस पक्षात येणारे नेते ठराविक लोकांना हताशी धरून आपला स्वार्थ साधत आहेत.पिढ्यांनपिढ्या डोळे झाकुन धनुष्यबाणावरचं बटन  दाबणाऱ्या शिवसैनिकांच्या पदरात काय पडले ? याची थोडीसुद्धा फिकीर या लोकांना राहिलेलो नाही.

शिवसेनेला चारही बाजुनी घेरले जात असताना व  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी असताना संपर्क प्रमुख, सर्व जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख यांनी समन्वयाने काम करणे अपेक्षित असताना वर्चस्व गाजविण्याची सुरु असलेली सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची केविलवाणी धडपड शिवसैनिक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.

शिवसैनिक हा विस्तव आहे .तो कधी विझणार नाही मात्र पदाधिकाऱ्यांनी गटबाजीच्या चक्रातुन बाहेर पडुन फुंकर मारणे गरजेचे आहे. आजही शिवसैनिक जिवाचे राण करून भगवे वादळ निर्माण करण्याची ताकद ठेवून आहे. परंतु जिल्ह्यातील गटबाजी थांबवून सर्वांना सोबत घेवुन जाणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.पक्ष प्रमुख शिवसैनिकांचा आवाज ऐकतील का?