खिशात होते अवघे 300 रुपये भावाने सुरू केला बिनधास्त वडापाव

मुंबई : जेव्हा माणूस अडचणीत  असतो , तेव्हा त्यांच्या समोर येतात ते आई -वडील. आई-वडील जरी नसले तरी त्यांची शिकवण नेहमी आपल्या सोबत असते. मागील वर्षी कोरोनाच्या लाटेमध्ये अनेकांनी नोकऱ्या गमावल्या, काहीनी जवळच्या माणसे देखील गमावली. असंच काही ठाण्यातील डोंबिवली राहणाऱ्या ओमकार गोडबोले सोबत झालं.

2018 मध्ये अचानक ओमकारने त्यांचे आई-बाबा गमावले. त्या नंतर तो आणि त्यांची बहीण दोघेच राहत. बहीण देखील काही कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी गेली. ओमकार एकटाच ठाण्यात राहत होता. ओमकार इवेंटची काही कामं करत पण मागील वर्षी लॉक डाऊन लागला आणि सर्वजण घरात बंदिस्त झाले.

ओमकार देखील घरातच बसून होता, त्याला विविध पदार्थ बनविण्याची भारी आवड होती. आई सतत आजारी असल्यामुळे ओमकारने आईकडून अनेक पदार्थ शिकले होते. त्यांची आई उत्तम वडापाव बनवत असे, ओमकार देखील आई प्रमाणे चवदार वडापाव बनवत.

जेव्हा केव्हा आईला बरं नसतं तेव्हा ओमकार जेवण बनवत असे. लॉक डाऊन काळात हाती काम नाही, घरी बसून असल्यामुळे तो नवनवीन पदार्थ बनवत. एक दिवशी त्यांच्याकडे शेवटचे 300 रुपये उरले. हे 300 रुपये संपले की आपलं अवघड होणार यांची जाणीव त्याला होती.

त्याने त्या 300 रुपयांत वडापावचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. सोशल मिडियावर जाहिरात केली. बिनधास्त वडापाव नावाने व्यवसाय सुरू केला. ओमकारच्या मित्रांना आधीपासूनच त्यांच्या हातची चव आवडत असे, त्यामुळे मित्रांनी देखील त्याला भरघोस मदत केली.

ओमकारचा एक मित्र उत्तम फोटोग्राफर आहे, तो ओमकारच्या वडापावचे भारी -भारी फोटो काढत आणि सोशल मिडियावर पोस्ट करत. यातून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बिनधास्त वडापावशी जोडला गेला. लॉकडाऊन काळात ओमकार घरातूनच वडापाव विकत, त्यांचे मित्र ऑर्डर डिलिव्हर करत पण लॉकडाऊन संपल्या नंतर मित्र देखील त्यांच्या कामाला लागले, त्यामुळे ऑर्डर डिलिव्हरी करणे शक्य होत नव्हते.मग ओमकारने एक स्टॉल भाड्याने घेतला आणि आता तो तेथे त्यांचा व्यवसाय करतो.

ओमकारच्या मित्रांनी त्यांचा स्टॉल देखील खूप सुंदर सजविला आहे.ओमकार आईकडून शिकलेल्या वडापाव आज त्यांची रोजीरोटी बनली आहे. ओमकार महिन्याकाठी 20 हजार रुपये कमावतो. एका वर्षात त्यांनी बरीच चांगली प्रगती केली आहे.

ओमकार म्हणतो आई-वडील जरी आयुष्यभर आपल्या सोबत नसले तरी त्यांचे संस्कार आणि त्यांची शिकवण आयुष्यभर आपल्या सोबत असते. ओमकार सोबत तर त्यांच्या आईच्या हातची चव देखील नेहमी सोबत असणार आहे.

हे देखील पहा