गजानन बाबर यांच्या निधनाने महाराष्ट्रात नेतृत्व करणारी शिवसेनेची बुलंद तोफ हरपली – नीलम गोऱ्हे

पुणे : शिवसेनेचे माजी खासदार आणि दीर्घकाळ विधानसभेचे सदस्य पद भूषविलेले गजानन बाबर यांचे दुःखद निधन झालेले आहे. अनेक वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या समवेत फार मोठा काळ त्यांनी शिवसेनेला साथ दिली. ज्याकाळामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा इतर पक्षांचा बालेकिल्ला होता त्याकाळामध्ये गावागावांमध्ये शाखांची बांधणी करून वेगवेगळ्या प्रकारच्या समाजातील घटकांच्यासाठी ते सातत्याने आवाज उठवत होते.

पिंपरी-चिंचवडमधली घर तिथल्या रहिवाशांच्या नावाने व्हावीत यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य समर्पित केलेला होतं. त्याचबरोबर रेशन दुकानदार, रिक्षाचालक, कामगार वर्ग या सगळ्यांच्या मध्ये अतिशय विश्वासू नेते म्हणून त्यांचे नाव होतं.

श्री बाबर आणि माझा अनेक वर्षाचा परिचय होता. अनेक प्रश्न लक्षवेधी विधानसभेत माननीय श्री गजानन बाबर यांनी विधानपरिषदेत मी अनेक सामाजिक , राजकिय विषय घेतलेले होते. अनेक त्यांच्या सभा संमेलन कार्यक्रम प्रचार सभा यांच्यामध्ये मी सहभागी झाले होते .अनेक आंदोलनांमध्ये गजानन बाबर हे त्यांच्या खुमासदार शैलीमध्ये सर्व श्रोत्यांची मन जिंकून घेत असत. ते आल्यावरच लोकं प्रतिसाद देत त्यांच्या भाषणाच्यासाठी मनःपूर्वक त्याच्यामध्ये सहभागी होत असत.

गजानन बाबर यांच्या कुटुंबातील सर्वजणांनी शिवसेनेला स्वतःचे जीवन अर्पण केलेला आहे. त्यांच्या निधनामुळे आयुष्यभर शिवसेनेला समर्पण केल्याबरोबरच ‘भगवाच माझ्या खांद्यावर घेऊन मी माझं शेवटचा श्वास घेईन’ हे म्हणत त्यांनी आणि त्यांचं हे वचन शिवबंधनासह निर्गमन करून त्यांनी खरं करुन दाखवलेला आहे.

एक अत्यंत तळमळीचे शिवसैनिक पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात नेतृत्व करणारे आघाडीची बुलंद तोफ आणि जनतेसाठी समर्पित केलेले नेते अशा प्रकारचे वर्णन करता येईल. गजानन बाबर यांच्या निधनामुळे शिवसेनेचे आणि पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र तसेच सातारा जिल्हा खासकरून यांचे अपरिमित अशी हानी झालेली आहे. विधानपरिषदेची उपसभापती या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आणि ज्याप्रश्नांवर त्यांनी काम केलं त्यांच्या समवेत आम्ही सातत्याने काम करत राहू असं या ठिकाणी नमूद करते, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.