राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पूर्ण पाठीशी – अजित पवार

मुंबई – महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा देऊन आघाडी सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आज राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार, खासदार आणि फ्रंटल पदाधिकारी यांची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. या बैठकीला काही आमदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे उपस्थित होते तर दोन आमदार कामानिमित्त उपस्थित नव्हते अशी माहितीही माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा असून यासंदर्भात काल आणि आज बोललो आहे त्यामुळे यापेक्षा राष्ट्रवादीची वेगळी भूमिका नाही अशी विनंती अजित पवार यांनी मिडियाला केली.

महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात गेलेले दोन आमदार परत आले आहेत. त्यांनी जे काही घडले ती भूमिका मांडली आहे. जे इथे नाहीत त्यांना परत येण्याचे आवाहन उध्दव ठाकरे व त्यांच्या नेत्यांनी केले आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडींवर व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आघाडी सरकार टिकवण्याची भूमिका आहे असेही अजित पवार म्हणाले.

सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे त्यामुळे संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले त्यावर आम्हाला टिका करायची नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आघाडीतील मित्रपक्ष काही स्टेटमेंट करत आहेत मात्र अडीच वर्षांमध्ये निधीत कधीही काटछाट केली नाही. सगळा निधी दिला आहे. मी दुजाभाव केलेला नाही. सर्वांना मदत करण्याची भूमिका असते. लोकांचे प्रश्न सोडवत असतो असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.